पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : पुणे महानगर परिवहन मंडळच्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना एकदम खणखणीत आवाज कानावर पडतो….” बोला, तिकीट. तिकीट घ्या. पुढं सरका. तुमचा बस स्टॉप आला, चला…” वळून पाहिलं तर चुणचुणीत-स्मितहास्य करत तिकीट देणारी पण तितकीच कडक शिस्तीची लेडी कंडक्टर भेटते. तुडुंब गर्दीच्या बसमध्ये तिला अगदी सहजतेने काम करताना पाहून तिचं कौतुक वाटतं आणि आपण अभिमानाने तिच्याकडे पाहत राहतो. अशी ही ‘पीएमपी’च्या सेवेतील ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ म्हणजे रेश्मा सय्यद (वय 28). ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विज्ञान शाखेची पदवीधर असलेली रेश्माताई गेली दहा वर्षे वाहक पदावर काम करते आहे. तिचा कंडक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अडथळ्यांची शर्यत जिंकल्यासारखाच आहे. रेश्माताई मूळची बीड जिल्ह्यातील आहे, नोकरीनिमित्त ती पुण्यात स्थायिक झाली आहे. ( navratri special abhivadan navdurgana )
तिच्या घरी मुलींनी जास्त शिक्षण घ्यावं असं वातावरण नव्हतं व परवानगीही नव्हती. परंतु स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रेश्माताईला भरपूर शिकून नोकरी करायची होती. कुटुंबात कुणीच जास्त शिकले नसल्याने तिला काहीतरी करुन दाखवायचं होतं. म्हणून घरच्यांचा विरोध पत्करुन रेश्माताईनं विज्ञान शाखेची पदवी (B.SC.) पूर्ण केली. खाकी वर्दीचं कमालीचं आकर्षण असल्यानं तिला पोलीस व्हायचं होतं, तिने प्रयत्नही केले पण तसे झाले नाही. मग, एकदा ‘पीएमपी’मध्ये वाहक पदाच्या जागा भरावयाच्या असल्याची माहिती मिळाली आणि तिनं त्यासाठी अर्ज केला. रेश्माताईला पुण्यात मुलाखतीसाठी बोलावणं आलं, तिची निवडही झाली, प्रशिक्षण घेऊन कामही सुरु झालं आणि अगदी मनापासून हवी असलेली खाकी वर्दी तिला मिळाली.
सन 2012 मध्ये रेश्माताई पीएमपीच्या सेवेत वाहक म्हणून रुजू झाली. सोबत एक ड्रेस घेऊन मामा-मामीसोबत ती पुण्यात आली होती, नोकरी मिळाल्यावर परत गेलीच नाही. मामा-मामी तिला पुण्यात सोडून जाताना ती खूप रडली होती. पुण्यात आपलं कुणीच नाही. कसं होणार असं वाटू लागलं. पण, रेश्माताईला चांगले सहकारी-मैत्रिणी मिळाल्या आणि तिचा पुढचा प्रवास सोपा झाला. सुरुवातीला मैत्रिणीसोबत भाडेतत्वावर खोलीत राहिली.
- पगार यायला लागला पण तो पुरायचा नाही. मग रेश्माताई एकवेळच जेवण करुन राहिली, कधी गावाकडून खायला आणायची. पण, नोकरी करायची जिद्दच असल्याने तिनं या त्रासदायक परिस्थितीची घरच्यांना कधीच जाणीव होऊ दिली नाही.
एकनिष्ठपणे ती काम करत राहिली. सुरुवातीला कामात गोंधळायला व्हायचे. चटकन काही समजायचे नाही. ही मुलगी एवढ्या लोकांमध्ये काम करु शकणार नाही असं अनेकांना वाटायचं. पण अनुभव येत गेला आणि रेश्माताईनं अगदी पुरुष कंडक्टरच्या तोडीस तोड काम करत आपली चुणूक दाखवून दिली. सगळे सहकारी आणि अधिकारीही तिच्या कामाचे कौतुक करु लागले. तिला उत्कृष्ट वाहकाचं पारितोषिक मिळालं. एवढचं नव्हे तर रेश्माताई कित्येक महिला प्रवाशांची मैत्रिण झाली आहे आणि हीच तिच्या कामाची पोचपावती आहे.
आत्तापर्यंतच्या नोकरीत रेश्माताईने कात्रज डेपो अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच मार्गांवर काम केले आहे. तुडुंब गर्दीच्या बसमध्येही ही सहजतेने शिस्तीत, अचूकपणे काम करताना दिसते. काम करताना प्रवाशांशी हसतमुखानं सुसंवाद साधणे हेच तिच्या यशस्वी कामाचे गमक आहे. ‘वादाचे प्रसंग येऊ द्यायचे नाही, आले तरी ती शांततेत वाद सोडवयाचा, कुणी टारगटपणा केला तर जशास तसे उत्तर द्यायचं’, अशी तिची कामाची पद्धत आहे.
रेश्माताई आता सेवेत कायम झाली आहे. ती दोन लेकरांची आई आहे. तिला आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे. स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न तिला पूर्ण करायचं आहे. म्हणूनच ती आपली नोकरी अतिशय चोखपणे करतेय आणि ओव्हर टाईम ड्युटीही करायची तिची तयारी आहे. खरंच रेश्माताई पीएमपीची ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ आहे आणि घरुन नोकरीसाठीही अनुकूल वातावरण नसताना इथपर्यंत पोहचून तिनं अडथळ्यांची शर्यतच जिंकली आहे.
“मी कंडक्टर होईन असं कधीच वाटलं नव्हतं. या नोकरीत मला खाकी वर्दी मिळाली याचा फार आनंद वाटतो. कंडक्टरच्या नोकरीत अनेकांशी बोलताना मी माणसं ओळखायला शिकले. अनेक अडचणींतून मार्ग काढायला शिकले. यापुढेही असंच काम करुन भविष्यात डेपो मॅनेजर पदापर्यंत जाण्याची माझी इच्छा आहे.” – रेश्मा सय्यद
अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
– ब्राम्हणोली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अंकुश काळे; पाहा संपूर्ण यादी
– शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर