लोकसभेची रणधुमाळी संपली आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा श्रीरंग आप्पा बारणे हे विजयी झाले. सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत आप्पा बारणे खासदार झाले. त्यानंतर केंद्रातही सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे तिसऱ्या टर्ममध्येही बारणे हे सत्तेत असतील. यादरम्यान बारणे यांचे नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत होते. परंतू शिवसेनेच्या वाट्याला एकच राज्यमंत्रिपद आले आणि तेही प्रतापराव जाधवांच्या हाती गेल्याने बारणे हे निव्वळ हॅटट्रीकचे खासदार इतकेच राहिले. असे असले तरीही सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याने मावळ मतदारसंघातील काही प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याचे आव्हान आता बारणेंपुढे आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघात अद्यापही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक प्रश्न हे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेत. त्यामुळेच बारणेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांनी ‘दहा वर्ष सरले मग प्रश्न का उरले’ असा प्रचार केला होता. त्यामुळे आता बारणे पुन्हा निवडून आल्याने त्यांना या प्रश्नांना आता हात घालावाच लागेल. विजयाची हॅट्ट्रिक साजरी करत असतानात मतदारसंघापुढील प्रश्न सोडविण्याची जबाबदारी बारणेंवरच आहे. नदी सुधार, रेल्वे, मेट्रो विस्तारीकरण, महामार्ग रुंदीकरण, रेडझोन हद्द कमी करणे, पर्यटनस्थळांचा विकास, पर्यटनास चालना, रोजगारनिर्मिती करणे अशी अनेक आव्हाने त्यांना पेलावी लागणार आहेत. ( Maval Lok Sabha Constituency Pending Question Challenge to MP Shrirang Barne )
मावळ लोकसभेत एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहाही विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे प्रश्न आहेत.
मावळ विधानसभा – या मतदारसंघात किवळे, रावेत, देहूरोड, तळेगाव या भागामध्ये लष्करी क्षेत्र आहे. येथील शेतकऱ्यांना वाढीव परतावा देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याचबरोबर किवळे, देहूरोड, रावेत, प्राधिकरण या परिसरातील रेडझोनची हद्द कमी करणे हा प्रश्न आहे. प्राधिकरणमधील जुन्या शेतकऱ्यांना परतावा देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर मावळ मतदारसंघांमध्ये पवना, मुळा, इंद्रायणी या प्रमुख नद्यांचे कार्यक्षेत्र येते. या नदीच्या परिसरामध्ये नागरिकीकरण, औद्योगिकीकरण झाल्याने नद्या प्रदूषित झाल्याचत. त्यांच्या स्वच्छतेसाठी काम करावे लागणार आहे.
पिंपरी आणि चिंचवड विधानसभा – या मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, रस्ते सुधारणे, पाण्याची समस्या मिटवणे आदी प्रश्न आहेत. पिंपरीपर्यंत आलेली मेट्रो भविष्यात तळेगावपर्यंत नेणे, हिंजवडी-चाकणला जोडणारी प्रस्तावित मेट्रो मंजूर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुणे-मुंबई लोहमार्गाचे क्षेत्र मतदारसंघात आहे. तिसरा आणि चौथा ट्रॅक, आकुर्डीतील रेल्वे जंक्शन, रेल्वे ट्रॅक संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.
पर्यटनासाठी काम करण्याची गरज – देहूगाव, कार्ला, महड, चिंचवड ही तीर्थक्षेत्रे, भाजे, घारापुरीची लेणी, लोहगड, विसापूर हे किल्ले आणि खंडाळा, लोणावळा, माथेरान या पर्यटन क्षेत्रांचा एकत्रित विकास आराखडा करून पर्यटन विकासाला चालना देणे, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मावळ, कर्जत, उरण परिसरातील आदिवासी पट्ट्यातील भागांमधील विकास करणे हेही प्रमुख आव्हान आहे.
अधिक वाचा –
– मावळच्या 4 तरूणांनी सायकलवरून केली पंढरपूरची वारी, दोन दिवसात 544 किलोमीटर अंतर पूर्ण
– इंद्रायणी नदीची दुरावस्था दूर करा ! लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरपरिषदेला निवेदन । Lonavala News
– पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे