मावळ तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊन यावर्षी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या तब्बल पंधरा हजार विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळके यांनी ‘सरप्राईज गिफ्ट’ देऊन विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे. मावळ तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेऊन दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘वेट एन जॉय’ या वॉटर पार्क व ॲम्युझमेंट पार्कची दोन तिकिटे भेट म्हणून घरपोच पाठवली आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शैक्षणिक जीवनात दहावी व बारावीचे वर्ष हे प्रचंड कष्टाचे व तणावाचे मानले जाते. पुढील जीवनाची दिशा ठरवणारे हे वर्ष विद्यार्थ्यांना पालक व शिक्षकांच्या अपेक्षांचे ओझे पेलत पूर्ण करावे लागते. वर्षभर केलेल्या कष्टांचे चीज म्हणून परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ ठिकठिकाणी होतात. तुलनेत कमी मार्क मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांची मात्र कोठेही फारशी दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी दहावी व बारावी पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करुन त्यांनी सर्वांना सुखद धक्का दिला आहे. ( surprise gift from mla sunil shelke to students of maval taluka who passed ssc & hsc exam )
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये कोणत्याही दिवशी विद्यार्थी व त्याच्याबरोबर एका पालकाला वॉटर पार्क व अम्युजमेंट पार्कमध्ये जाऊन धमाल करता येणार आहे. पार्कमध्ये प्रवेश, पार्क मधील सर्व राईड्स, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा या प्रवेशिकेत समावेश असणार आहे. आमदार शेळके यांनी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे व घरचे पत्ते घेऊन या सर्व विद्यार्थ्यांना शेळके यांचे सहकारी घरी जाऊन सन्मानपूर्वक ‘सरप्राईज गिफ्ट’ देत आहेत.
आमदार शेळके यांच्याकडून अनपेक्षितपणे करण्यात आलेल्या या कौतुकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदारांनी ही कौतुकाची थाप पाठीवर दिल्यामुळे पुढील शिक्षणासाठी आम्हाला वेगळे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळत आहे. पालक वर्गाकडून देखील आमदार शेळके यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. दहावी व बारावी या महत्त्वाच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल पाल्यांचा अशा पद्धतीने गौरव करणाऱ्या आमदार शेळके यांना पालकांनी धन्यवाद दिले.
अधिक वाचा –
– वडगावातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । Vadgaon Maval
– राज्याचा अर्थसंकल्प वाचा सोप्या भाषेत, महिलांसाठी कोणत्या योजना, युवकांना काय मिळालं? राज्यावर किती कर्ज? पाहा एका क्लिकवर
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात ! वॅगनार कारमधील दोन जण जागीच ठार । Accident On Mumbai-Pune Expressway