Dainik Maval News : पवन मावळ विभागात गेले तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून गुरूवारी (दि. 25 जुलै) रात्री 10 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात 77.54 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच सायंकाळी चार वाजल्यापासून पवना धरणातील विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पवना धरणातील पाणीसाठ्यात झालेली भरभक्कम वाढ यामुळे मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहर वासियांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. असे असले तरीही पवन मावळसह मावळ तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आधीच मुसळधार पावसामुळे जलमय झालेले पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आता पवनेतील वाढणाऱ्या पाण्यामुळे अधिक सतर्क राहावे लागणार आहे. ( 77 percent water storage in Pavana Dam water release of 1400 cusecs started from )
पवना धरणात 77.54 टक्के पाणीसाठा
गुरूवारी रात्री 10 वाजता धरण विभागाने घेतलेल्या नोदीनुसार, धरणात 77.54 टक्के पाणीसाठा आहे. तसेच मागील 24 तासात धरण परिसरात 141 मीमी इतका पाऊस झाला आहे. तसेच या हंगामात अर्थात 1 जून पासून आतापर्यंत एकूण 1737 मीमी पाऊस झाला आहे. तसेच धरणातील पाण्याची आवक वेगाने होत असल्याने पवना धरणातून सायंकाळी 4 वाजल्या पासून विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेक विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पवना नदीकाठच्या नागरिकांना इशारा –
पवना धरण पाणलोट क्षेत्रात वाढत्या पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तो पावसाचे आणि पाण्याचे प्रमाण वाढल्यास वाढू शकतो. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, पवना धरणाच्या खालील बाजुस नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहून नदी तीरावरील जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– राज्यात आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर ; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री
– लोणावळा धरण ओव्हरफ्लो ! इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू, लोणावळा शहरातील नागरिकांना खबरदारीचा इशारा । Lonavala Dam News
– पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा, पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचना । Pavana Dam News