Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज (दि. 16 ऑगस्ट) मावळ तालुक्यात दाखल झाली. तळेगाव दाभाडे शहरात अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळकरांनी अजित पवार यांचे अतिभव्य स्वागत केले. जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तळेगावमधील सभेत महिला-भगिनींशी संवाद साधला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव येथील नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मैदानात ही सभा पार पडली. यावेळी अजित पवारांनी जनसन्मान यात्रेनिमित्त महिला भगिनींशी संवाद साधला. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्यामुळे तळेगाव दाभाडेला भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळं स्थान आहे. ऐतिहासिक तळेगाव दाभाडेला पर्यटनाची जोड पण आम्ही देण्याच्या प्रयत्नात आहोत. जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, पुणे शहरात आम्ही फिरलो. सगळीकडे मायमाऊलींकडून भरभरून मिळालेलं प्रेम पाहून मी सुखावून गेलो, असे अजित पवार म्हणाले. ( NCP Ajit Pawar Jan Samman Yatra Talegaon Dabhade Maval Taluka MLA Sunil Shelke )
मावळसाठी 2 हजार 800 कोटींचा निधी –
मी सरकारमध्ये सामील झाल्यामुळे चांगल्या अभिनव योजना तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी 2 हजार 800 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाद्वारे आम्ही महिन्याला दीड हजार रुपये व वर्षाला 18 हजार रुपये देणार आहोत. एकही भगिनी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. याशिवाय शिक्षणात मोठी सवलत, पिंक ई-रिक्षा योजना यांसारख्या अनेक योजनांचा लाभ माझ्या भगिनींना देण्यासाठी ही जनसन्मान यात्रा काढली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच, मावळ तालुक्यातील जनसन्मान यात्रादरम्यान जनतेनं केलेले स्वागत हे संस्मरणीय आहे. तमाम मावळवासियांचे मनापासून आभार मानतो, असेही दादा म्हणाले. यावेळी तालुक्यातील महिला वर्गांची मोठी उपस्थिती पाहून आमदार सुनिल शेळके देखील भारावून गेले. सर्व भगिनींनी बांधलेल्या राखीच्या स्वरुपातील निखळ बंधू-प्रेमाची उतराई कधीच होऊ शकत नाही, असे शेळके म्हणाले. त्यांनी आपल्या मनोगतात, विक्रमी संख्येने उपस्थित राहिलेल्या भगिनींविषयी प्रास्ताविकात कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या.
अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडचा आणि बारामतीचा कायापालट केला, पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला, याची सल मनाला अजूनही बोचते, अशी खंत शेळके यांनी व्यक्त केली. अजितदादांनी मावळसाठी खूप काही केले आहे. आणि मावळची जनता त्याची नक्की जाण ठेवील. मावळची जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणारी नाही, अशी ग्वाही शेळके यांनी दिली.
अधिक वाचा –
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News
– स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News