Dainik Maval News : ‘असं काही करा ज्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं घडेल’ असा सल्ला राष्ट्रीय खेळाडू तृप्ती शामराव निंबळे हिने दिला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचवड येथे स्त्री शिक्षण प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून तृप्ती शामराव निंबळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
निंबळे म्हणाल्या, ‘आता तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात आईवडिलांना माहिती न होता काही गोष्टी चोरून कराव्या वाटत असेल, परंतु चोरून करायचेच असेल तर असे काही करा की त्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं घडेल. आयुष्य बरबाद होईल अशा कोणत्याही गोष्टीला बळी जाऊ. खूप शिका आणि नाव कमवा. आपण स्त्रियाही पुरुषांप्रमाणे कणखर आहोत.’
मावळची सुवर्ण कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या तृप्ती निंबळे हिने देश आणि परदेशात तायकांदो कराटे स्पर्धेत अनेक सुवर्ण पदक पटकाविले आहेत. एका शाळेत त्या शारीरिक शिक्षिका म्हणून देखील कार्यरत आहेत. निंबळे म्हणाल्या, ‘कष्ट केले तर चांगले फळ मिळतेच, सावित्रीबाई फुले यांनी कष्ट केले म्हणून तर आपण आज शिक्षण घेत आहोत.’
तृप्ती निंबळे यांनी स्वत: होऊन पुढील शैक्षणिक वर्षात गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच उन्हाळी सुट्टीत विद्यार्थीनींना स्वसंरक्षणासाठी कराटे, लाठीकाठी आणि कुस्तीचे मोफत प्रशिक्षण देण्याचेही निश्चित आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात प्रशालेच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांनी विद्यार्थ्यांना संध्याकाळी ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या नावे अंगणात, दारात एक पणती लावण्याचा उपक्रम करायला सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैशाली कयापाक यांनी केले. प्रास्ताविक शुभांगी बडवे यांनी मांडले. अतिथी परिचय राजश्री पाटील यांनी करून दिला तर सुलभा झेंडे यांनी आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या