Dainik Maval News : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात सर्वप्रथम जंगल परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. नैसर्गिक पाणवठे आटल्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशात वन्यजीव कधी कधी जंगल सोडून मानवी वस्तीत येतात, या सर्व पार्श्वभूमीवर जंगलातील वन्यजीवांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये व पाण्यावाचून त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी मावळ तालुक्यात वनविभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागात आतापर्यंत 9 पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर आंदर मावळ परिसरात 27 ठिकाणी पाणवठ्यांची सोय करण्यात आली आहे. वनविभागाने केलेल्या एकूण 36 पाणवठ्यांमधून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.
- शिरोता वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या उकसान वनपरिमंडळातील राकसवाडी येथील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले. यावेळी शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, वनपरिमंडळ अधिकारी एम. बी. घुगे, जी. ए. भोसले, डी. डी. उबाळे, एस. बी. साबळे तसेच वनमजूर घुले उपस्थित होती. पाणवठ्यावर पाणी सोडण्याची ही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.
‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गराडे यांनी वनविभागाच्या प्रयत्नांचे स्वागत करताना सांगितले की, ‘वन्यप्राण्यांचे संवर्धन व त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे. हे कार्य स्थानिक नागरिकांसाठीही प्रेरणादायी आहे.’ वनविभागाच्या या उपक्रमामुळे जंगल परिसरात राहणाऱ्या वन्यजीवांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार असून मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासही मदत होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार
