पवनानगर (प्रतिनिधी – रवि ठाकर) : शिक्षणासाठी वयाची अट नसते, इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण पवन मावळातील तुंग गावच्या सीमा शांताराम पाठारे यांनी घालून दिले आहे. लग्नानंतर तब्बल १७ वर्षांनी पुन्हा शिक्षणाची वाट धरत त्यांनी दहावीच्या परीक्षेत ६८ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
विशेष म्हणजे मुलगा स्वराज आणि पुतण्या केतन यांच्या सोबतच त्यांनीही दहावीची परीक्षा दिली. त्यामुळे एकाच घरातील तिघांचा हा यशस्वी शैक्षणिक प्रवास परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
तुंगसारख्या डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या ग्रामीण भागात राहून घरातील जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षण पूर्ण करणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र सीमा पाठारे यांनी त्या आव्हानांवर मात करत स्वतःचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. घरची शेती, अॅग्रोटुरिझम व्यवसाय, महिला बचतगटांमध्ये सीआरपी म्हणून काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विद्यार्थ्यांना अध्यापन अशा अनेक जबाबदाऱ्यांचा ताळमेळ साधत त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले.
त्यांचा मुलगा स्वराज याने ८८.८० टक्के गुण मिळवत उज्ज्वल यश मिळविले, तर पुतण्या केतन याने ६२ टक्के गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली. घरातील तिन्ही सदस्यांनी एकाच वेळी अभ्यास करून मिळविलेल्या या यशामुळे पाठारे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सीमा पाठारे या तुंग येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण शिकवतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना स्वतःचे शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत त्यांना सतावत होती. अखेर त्यांनी धाडसी निर्णय घेत पुन्हा पुस्तक हातात घेतले आणि स्वतःलाही सिद्ध करून दाखवले. त्यांच्या या यशामुळे अनेक महिलांमध्ये शिक्षणाबाबत नवी उमेद निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात महिलांनी संसार आणि जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशा परिस्थितीत सीमा पाठारे यांनी दाखविलेली जिद्द आणि चिकाटी महिलांसाठी सकारात्मक प्रेरणा देणारी ठरत आहे. “शिकायची इच्छा असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते,” हा संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित होत आहे.
“घर, नोकरी आणि शिक्षण या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना माझ्या पतींनी मला खूप मोठा आधार दिला. जसं सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांची साथ मिळाली, तसाच पाठिंबा मला माझ्या पतींकडून मिळाला. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी हे यश मिळवू शकले. ६८ टक्के गुण मिळाल्याचा आनंद आहे आणि पुढेही शिकत राहण्याची इच्छा आहे.” – सीमा पाठारे
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता