Dainik Maval News : वडगाव मावळ शहरातील ढोरेवाडा येथील मोरया चौकात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच चौकातील मोकळ्या जागेत नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ओपन जिम उभारण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय दंडेल यांनी नगरसेवक पंढरीनाथ राजाराम ढोरे व स्थानिक नगरसेविका रुपाली अतुल ढोरे यांना निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ढोरेवाडा परिसरातील मोरया चौक हा नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेला तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा चौक आहे. या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, चोरी व इतर गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी, वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी तसेच अनुचित घटना घडल्यास तपासास मदत व्हावी, यासाठी चौकात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक आहे.
तसेच मोरया चौक परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागेचा नागरिकांच्या हितासाठी उपयोग करून तेथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज ओपन जिम उभारण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांना नियमित व्यायामासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध होऊन नागरिकांच्या आरोग्य संवर्धनाला चालना मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरसेवक पंढरीनाथ राजाराम ढोरे व नगरसेविका रुपाली अतुल ढोरे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तुमकर व पत्रकार सतीश गाडे उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं
