अत्यंत प्रतिष्ठेची आणि रंगतदार झालेली मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या पॅनलने 17-1 अशा फरकाने जिंकली. मागील महिन्यात दिनांक 29 एप्रिल रोजी मतमोजणी झाली होती, त्यानंतर आता तब्बल 25 दिवसानंतर म्हणजेच येत्या 24 मे (बुधवार) रोजी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांनी ही माहिती दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी मित्र पक्ष पुरस्कृत सहकार पॅनल अशा दोन पॅनलमध्ये सरळ लढत होती. या निवडणूकीच्या निमित्ताने विद्यमान आमदार सुनिल शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत महाविकास आघाडीचे 17 उमेदवार निवडणूक आले आणि बाजार समितीवर मविआचा झेंडा रोवला गेला. ( Maval Agricultural Produce Market Committee Chairman Deputy Chairman Election on 24th May )
परंतू आता प्रत्यक्षात सभापती आणि उपसभापती पदासाठी मविआ पॅनलच्या विजयी उमेदवारांत मोठी रस्सीखेच असलेली पाहायला मिळत आहे. मविआ पॅनलमधील विजयी संचालकांमध्ये अनेक जुणे जाणते चेहरे आहेत, तसेच तालुक्यात चर्चेत असणारे अनेक नवखे चेहरेही आहेत. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहावे लागेल.
सभापती पदाचा मान आपल्याला मिळावा, यासाठी जरी अनेकांनी मोर्चे बांधणी सुरु केली असली तरीही आमदार सुनिल शेळके, बापू भेगडे, बबनराव भेगडे, माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वात कुणा एकाच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊन सभापती आणि उपसभापती पदाची निवड बिनविरोध होईल, असे बोलले जात आहे. मात्र तरीही इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकूण 17 पैकी सभापती पदासाठी चर्चेत असलेली प्रमुख 5 नावे आहेत, तसेच उपसभापती पद देऊन समाधान केले जाईल अशीही काही नावे चर्चेत आहेत.
‘या’ नावांची होतेय चर्चा…
सभापती पदाच्या चर्चेत सुभाष रघुनाथ जाधव, शिवाजी चिंधु असवले, संभाजी आनंदराव शिंदे, नामदेव नानाभाऊ शेलार आणि भरत दशरथ टकले ही नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. यातही सुभाष जाधव, शिवाजी असवले आणि संभाजी शिंदे यांची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.
आता प्रत्यक्षात 24 मे रोजी ही सभापती आणि उपसभापतीची निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांनी सदर निवडणूकीची माहिती देताना सर्व सदस्यांना नोटीसा दिल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच 24 तारखेला शिक्षक सोसायटीच्या हॉलमध्ये ही निवडणूक होणार आहे. तेव्हा कुणाला सभापतीचा मान मिळणार आणि कोण उपसभापती म्हणून मिरवणार हे 24 तारखेलाच समजेल.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– आनंदवार्ता! श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 5000 विशेष बसेस सोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Ashadhi Wari 2023
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case