Accident on Mumbai Pune Expressway : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर किलोमीटर 43.400 येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 5 जण जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. 26 जून) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता. मुंबई लेनवर कल्याणकडे जात असताना खोपोली पोलिस ठाणे हद्दीत कारचा अपघात झाला. एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांची ही कार होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लहू कारभारी (रा. कल्याण जि. ठाणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, जयदेश चौधरी वय-39 (वाहन चालक), संतोष भोईर (वय-55), दिनकर बापू पाटील (वय-68) नरेश जाधव आणि अज्ञात इसम (नाव समजू शकले नाही) सर्व राहणार कल्याण (जि. ठाणे) अशी जखमींची नावे आहेत. ( Accident on Mumbai Pune Expressway of devotees returning after seeing Ekvira Devi )
प्राप्त माहितीनुसार, इर्टिगा कार (क्रमांक MH-05 EJ-8460) चालक जयदेश चौधरी सदर कारमधून वर नमूद जखमी आणि मयत यांच्यासह एकविरा येथून एक्सप्रेस वे वरून कल्याण येथे जात होते. त्यावेळी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार पहिल्या लेनच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडकून अपघात झाला. अपघातामध्ये लहू कारभारी हे जागेवरच ठार झाले. तर अन्य 5 जण गंभीर जखमी झालेत.
जखमींना तातडीने उपचारासाठी एमजीएम रूग्णालय कामोठे येथे पाठविण्यात आले आहे. अपघातामधील मयत यास पुढील कार्यवाही करिता खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले होते. अपघाताची माहिती समजताच बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य सेवा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी मदत कार्य केले होते. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला असून अपघाताची चौकशी सुरू आहे.
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय ! पुणे रिंग रोड बाबत महत्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘धनलाभ’, वाचा सविस्तर
– होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन मार्फत 600 देशी झाडांची लागवड