मावळमधील टाकवे बु. येथील न्यू इंग्लिश स्कूलचे १९९६-९७ च्या विद्यार्थ्यांनी तब्बल २७ वर्षांनी (दिनांक ९ जुलै) एकत्र येऊन एक आगळा वेगळा स्नेह मेळावा साजरा केला. कान्हे येथील साईबाबा सेवाधाम येथील सभागृहामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी खास पुणे, मुंबई, चाकण, खेड, आळंदी, सातारा अशा अनेक ठिकाणी स्थायिक असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आवर्जून उपस्थित होते. सर्वांच्या प्रवासाच्या सोयीनुसार सभागृहाचे स्थळ निवडण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मेळाव्यासाठी विविध विषयानुसार शिक्षकांना निमंत्रित केले होते. भाषेचे शिक्षक, गणित – विज्ञानाचे शिक्षक, इतिहासाचे शिक्षक, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक आदींना सन्मानपूर्वक आमंत्रण दिले होते. ( Alumni Meet of New English School Of Takwe Budruk Maval Taluka )
कार्यक्रमाची रूपरेषा ही शाळेतील दैनंदिन उपक्रमांवर आधारित होती. राष्ट्रगीत, दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, वृक्ष पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचा अल्प परिचय करण्यात आला. इतक्या वर्षांत अनेकांचे चेहरे मोहरे अगदी बदलून गेल्यामुळे प्रत्येकास नावानिशी ओळखणे मोठे जिकिरीचे होते. ओळख परेड झाल्यानंतर पाहुण्यांचा आदरयुक्त सन्मान करण्यात आला. मामासाहेब दांडेकर यांची सार्थ ज्ञानेश्वरी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि वृक्षभेट देऊन सर्व सन्माननीय गुरुवर्यांचा सन्मान सोहळा पार पडला.
अनुभव कथन करताना विद्यार्थी शालेय जीवनात मग्न होऊन गेले होते. शाळेत घडलेले प्रसंग, वर्गातील किस्से अगदी रंगून सांगण्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील दंग होऊन गेले होते.
हेही वाचा – 14 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! शिवली येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
१९९६ -९७ च्या ह्या बॅचचे विद्यार्थी आज वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वीरीत्या वाटचाल करत आहेत, हे पाहून, ऐकून शिक्षक मंडळी अगदी भारावून गेली होती. शिक्षक अनेक पिढ्या घडविण्याचे काम करत असतात. शालेय शिक्षण देता देता शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे धडे जर यशस्वीपणे देता आले तर माणूस घडविण्याचे कार्य हे शिक्षकांमार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने घडू शकते, यावर अशा माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातून सातत्याने अनुभव येत असतो. चांगला शिक्षक सातत्याने शिकण्याची आणि शिकविण्याची भूमिका बजावत असतो. माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया शिक्षकांना एक वेगळी ऊर्जा देऊन जातात. आपल्या अध्यापन पद्धतीबाबत परिणामकारी प्रत्याभरण माजी विद्यार्थ्यांकडून होत असते. शिक्षकांनी देखील या प्रतिक्रियांकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले तर शिक्षण पद्धतीमध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही.
एक चांगला शिक्षक अनेक चांगल्या पिढ्या घडवू शकतो. टाकवे हायस्कुलमधील हे सगळे शिक्षक खरोखरच तन – मन – धनाने काम करत असतात. अनेक यशस्वी पिढ्या घडविण्याचे कार्य सदर शिक्षक करत आहेत, हे कालच्या या स्नेह मेळाव्यानिमित्ताने अनुभवायला मिळाले.
स्नेह मेळाव्याला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक मिसळता यावे, विचारपूस व्हावी, खुशाली कळावी यासाठी गप्पा मारता मारता विविध फनी गेम्सचे देखील आयोजन करण्यात आले होते. एका मिनिटात जास्तीत जास्त केळी खाणे, बिस्कीट खाणे, सुई दोरा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, अशा विविध इंटर ऍक्टिव्ह गेम्सचा समावेश कार्यक्रमात केला होता. ,”खेळता खेळता मारा गप्पा” हाच त्यामागचा उद्देश होता.
हेही वाचा – देहूरोडचा सुपुत्र क्रिकेटर निहाल तुसमाड याला ‘मावळ रत्न’ पुरस्कार । Nihal Tusamad
कार्यक्रमादरम्यान, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, सांप्रदायिक, प्रशासकीय क्षेत्रात, ज्यांनी यशस्वी वाटचाल करत आपले ध्येय गाठले अशा सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केल्यानंतर आभार प्रदर्शन करून वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मेळाव्याच्या नियोजनामध्ये वैशालीताई म्हाळसकर, इंदुमतीताई सातकर, विलास पवळे, जालिंदर मालपोटे, रोहिदास जांभुळकर, आणि तुळशीराम जाधव यांनी विशेष सहभाग घेतला. रांगोळी रेखांकन हे शाळा आणि शाळेत पाठीशी दप्तर घेऊन चाललेले विद्यार्थी या संकल्पनेशी निगडित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम जाधव आणि वैशालीताई म्हाळसकर यांनी केले. आभार वर्गमित्र अशोक वाडेकर सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमस्थळी सुरुची भोजनाची तसेच चहा नाश्त्याची सोय वर्गमित्र मंगेश जगनाडे यांनी केली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गीता भेट देण्यात आली.
इयत्ता दहावीतील १९९७ सालातील हे विद्यार्थी एकत्र करणे खरोखरच जिकिरीचे होते परंतु प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर हे सगळं शक्य झालं. शालेय आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपुलकीचं, प्रेमाचं, शाबासकीचं, गाठोडं सोबत नेलं, एवढं मात्र नक्की….!
अधिक वाचा –
– कासारसाई धरणाबाबत मावळ – मुळशी तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आमदार शेळकेंसोबत संयुक्त बैठक
– इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर, ‘असा’ चेक करा निकाल