Dainik Maval News : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून वारकरी संप्रदायासाठी देहू, आळंदी आणि परिसरातील पंचक्रोशी अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे देहू ते आळंदी या १६ किलोमीटर पालखी मार्गास राज्य शासनाने संतभूमी म्हणून घोषित करून या परिसराच्या जतन व संवर्धनासाठी विशेष धोरण राबवावे, अशी मागणी आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी केली.

पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अभय टिळक म्हणाले की, उत्तराखंड सरकारने काही क्षेत्रांना देवभूमी म्हणून विशेष संरक्षण दिल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही देहू-आळंदी परिसराला संतभूमी घोषित करून त्याच्या पावित्र्याचे जतन करावे.
या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक सुरक्षितता आणि नियोजनबद्ध विकासासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हभप राजू महाराज ढोरे यांनी देहू-आळंदी मार्गाच्या दुतर्फा किमान १०० मीटर परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.
डॉ. स्वाती मुळे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत वाढत्या नागरीकरणामुळे या परिसरात वेगाने शहरीकरण झाले आहे. वाहतुकीचा ताण वाढला असून इंद्रायणी नदीत अनेक ठिकाणी प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत आहे. संतभूमीचा दर्जा मिळाल्यास या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
हभप राजू महाराज ढोरे यांनी, राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी हा विषय उपस्थित करून शासनाकडून मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी केली. यासोबतच वारकरी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये संतभूमी संकल्पनेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू



