पुणे प्रतिनिधी – संध्या नांगरे : शहरातून मेट्रो रेल्वे सुसाट धावू लागली आहे. चकचकीत मेट्रो स्टेशन दिमाखात उभी राहिली आहेत. मात्र, पुणे महानगर परिवहन मंडळाच्या बसेससाठी उभारलेल्या शहरातील अनेक बीआरटी थांब्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. ‘पीएमपी’ची बससेवा शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बीआरटी (Bus Rapid Transit ) चे निगडी ते दापोडी, सांगवी ते किवळे, काळेवाडी-चिखली स्पाईन रोड आणि आळंदी ते दिघी हे बीआरटी मार्ग आहेत. त्यापैकी निगडी ते दापोडी व डांगे चौक ते सांगवी हे प्रमुख मार्ग म्हटले जातात. प्रशासनाने या बीआरटी मार्गांवर लाखो रुपये खर्च करुन सुसज्ज थांबे बांधले. थांब्यांवर सुरक्षा कर्मचारी व त्यांच्यासाठी केबीन, थांब्यांना सुरक्षेसाठी स्वयंचलित दरवाजे, बसेसचे मार्ग आणि वेळा दाखवणारी इलेक्ट्रॉनिक स्क्रीन, बसावयासाठी आसने अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. परंतू प्रशासनाच्या अनास्थेमुळे आता या सुंदर थांब्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतेच आहे आणि थांबे उभारण्यासाठी झालेला भरमसाठ खर्च वाया गेला आहे. ( Bad condition of Pimpri Chinchwad Municipal Corporation BRT route and bus stop )
- बीआरटी थांब्यांवर लक्ष देण्यासाठी, प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक थांब्यावर नेमलेले सुरक्षा कर्मचारी आता काढले आहेत. त्यामुळे थांब्यांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर पडली आहे. थांब्यांवरील स्वयंचलित दरवाजे देखभालीअभावी बंद पडून त्यांच्या काचा फुटल्या-फोडल्या, दरवाजे मोडले. आता तर बहुतांश थांब्यांना दरवाजेच राहिलेले नाहीत; कारण ते चोरीला गेले आहेत, थांब्यावरील सुरक्षा रक्षकांच्या केबीन मोडतोड होऊन पडल्या आहेत. तिथे भंगार सामान रचले आहे. दिवे खराब झाले आहेत.
थांब्यांवर नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्यामुळे बीआरटी थांब्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अवतीभवती कचरा साचला आहे, लोकांनी थुंकून घाण केली आहे. एवढेच नव्हे तर अनेक थांबे म्हणजे भिकाऱ्याचे आसऱ्याचे ठिकाण व मद्यपीचे अड्डे बनले आहेत, तिथे दारुच्या बाटल्या पडल्या आहेत. दरवाजाच्या काचांवर, जाहिराती चिकटवून, थुंकून, चित्रे काढून थांबे विद्रूप झाले आहेत. देखरेख करण्यासाठी कोणीच नसल्यामुळे मद्यपी, रिकामटेकडे लोक, टवाळखोर तरुण या थांब्यांवर उगाचच तासनतास बसलेले असतात; त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांना असुरक्षित व गैरसोयीचे वाटत आहे.
सर्व थांब्यावरील बसेसच्या वेळा व मार्ग क्रमांक दाखवणारी यंत्रणा (electronic screen) बंद आहे. पर्याय म्हणून तेथे बसेसच्या मार्गाची नावे कागदावर टाईप करुन चिकटवले होते, ते कागदही आता राहिले नाहीत. त्यामुळे कुठली बस कुठे जाते, याची नेमकी व अचूक माहिती प्रवाशांना मिळत नाहीये. थांब्यांवरील दोन दरवाजापैकी कोणत्या दरवाजात थांबायचे हा गोंधळ होत असून बस आली की तारांबळ उडते. अपंग प्रवासी तर ताटकळत थांबलेले असतात. नियमित प्रवासीच प्रवाशांना मदत करतात.
बीआरटी थांब्यांवरील या दुरवस्थेचा त्रास दररोज हजारो प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासन उदासीन आहे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. प्रशासन आता बीआरटीकडेही गांभीर्यने लक्ष देऊन दुरवस्थेचे हे चित्र कधी बदलेल? याचीच प्रतिक्षा आहे.
अधिकारी म्हणतात –
“बीआरटी थांब्यांवर सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहेच. परंतु, सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी ‘पीएमपी’ची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे महापालिकेने यासाठी लक्ष दिले पाहिजे. आम्ही ‘पीएमपी’ने सहकार्यासाठी पोलिस स्टेशनला पत्र दिली आहेत. पोलिसांनी गस्त ठेवल्यास बीआरटी थांबे आणि प्रवासी सुरक्षित राहतील. थांब्यांच्या स्वच्छतेसाठी डेपोकडून कामगार नेमले आहेत. मध्यंतरी प्रेशर मशीनद्वारे थांबे धुतले होते. मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. त्यामुळे स्वच्छतेच्या कामालाही मर्यादा येतात.” – अनंत वाघमारे, बीआरटी व्यवस्थापक
अधिक वाचा –
– खंडाळ्यात अवैधरित्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा छापा! दारूचा मोठा साठा जप्त । Lonavala Crime News
– एकाचवेळी 6 विषारी घोणस सर्पांना जीवदान! शेततळ्यातून सापांना बाहेर काढताना सर्पमित्रांची कसोटी । Raigad News
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग! Maval Politics