बैलगाडा मालक आणि त्यांचे बैल यांच्यात अत्यंतिक जिव्हाळ्याचं नातं असतं. प्रत्येक गाडामालक आपल्या बैलांवर जीवापाड आणि अगदी पुत्रवत प्रेम करत असतो. काही ठिकाणी तर जी चीजवस्तू घरातील लेकरांना मिळत नाही, तिही शर्यतीतील बैलांसाठी आणली जाते. त्यांचे उठणेबसणे, खाणेपिणे, राहता निवारा या सर्वांवर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं जातं. जेव्हा मालक आपल्या बैलाला इतका जीव लावत असतो, तेव्हा तो बैलही प्रयत्नांची पराकाष्ठा करून शर्यतीत मालकासाठी जीवतोड धावत असतो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जेव्हा हा बैल घाटात विजयी होतो, तेव्हा पंचक्रोशीत बैलासह त्याच्या मालकाचंही नाव गाजत असतं. महाराष्ट्राची ही परंपराच आहे. त्यामुळे बैलगाडा मालक आणि त्यांचा बैल यांच्यातील जिव्हाळ्याची अनेक जगावेगळी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. मावळ तालुका हा देखील बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच तालुक्यात अनेक नामवंत बैल आणि बैलगाडा मालकही आहेत. अशाच एका बैलगाडा मालकाची आणि त्याच्या बैलाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ( Bullock Cart Owner Built Mausoleum Of Bull Khandya Farmer Rahul Jadhav Nanoli Village Maval )
मावळ तालुक्यातील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव हेही बैलगाडा मालक आहेत. त्यांच्या गाड्याचा बैल खंड्या हा तर संपूर्ण पुणे जिल्ह्याला परिचित. परंतू काही दिवसांपूर्वीच या खंड्या बैलाचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. आपला लाडका बैल गेल्याने संपूर्ण जाधव कुटुंब एखादा कर्ता व्यक्ती जावं अशा रितीने दुःखसागरात बुडाला. त्यामुळेच आपल्या या लाडक्या खंड्याची स्मृती कायम आपल्या डोळ्यासमोर राहावी, यासाठी गाडामालक राहुल जाधव यांनी त्याची समाधी बांधण्याची निर्णय घेतला आणि समाधी बांधली सुद्धा.
जाधव कुटुंबियांनी खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्याचा रितसर दशक्रिया विधी केला. दशक्रिया विधीला मोठ्या प्रमाणात गर्दीही जमली होती. तसेच त्याच्या पुतळा उभारून समाधीचीही पूजा करण्यात आली. बैलगाडा शर्यतीत खंड्या बैलाने आजवर अनेक विक्रम केले होते. 65 हून अधिक शर्यती त्याने जिंकल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र केसरी असा नावलौकिकही खंड्या बैलाने मिळवला होता. इतकेच नाही तर शेवटच्या क्षणी देखील खंड्या बैलाने घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला होता. परंतू आता हा खंड्या फक्त समाधीरुपी स्मृती बनून सर्वांच्या लक्षात राहणार आहे.
अधिक वाचा –
– Breaking! महाराष्ट्र सरकारकडून 22 जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर, श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सुट्टी जाहीर
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावोस दौरा प्रचंड यशस्वी; जागतिक आर्थिक परिषदेत तब्बल 3 लाख 53 हजार कोटींहून अधिकचे सामंजस्य करार
– मावळ तालुक्याला नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभाचा मान! मंडपाचे भूमिपूजन आणि रंगमंच, प्रवेशद्वाराचे नामकरण संपन्न । Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan