चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. दिनांक 18 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, आजपर्यंत या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाने प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवण्याची चिन्हे दिसू लागल्याने आजअखेर भाजपाने दोन्ही ठिकाणचे पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर केलेत.
त्यानुसार, भाजपाकडून कसबा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक साठी हेमंत नारायण रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीने ही नावे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने आता मविआतून नेमकी कोणती घोषणा होणार, हे पहावे लागेल. ( Chinchwad And Kasba Assembly Constituencies By Elections Bharatiya Janata Party Announced Official Candidate Names )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. त्यामुळे चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. तर, पुणे शहराच्या माजी महापौर आणि कसबा विधानसभेच्या भाजपाच्या माजी आमदार स्व. मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. त्यामुळे कसबा विधानसभेकरिता पोटनिवडणूक होत आहे. राज्यातील प्रथेनुसार या दोन्ही जागा बिनविरोध व्हाव्यात, तसेच दोन्ही ठिकाणी गत आमदारांच्या कुटुंबीयांपैकी कुणाला उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरण्यात आला होता. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने कुणाच्याही नावांची घोषणा केली नव्हती. मात्र, आज अखेर भाजपाने या दोन्ही ठिकाणचे अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम…
भारत निवडणूक आयोगाने 215- कसबा पेठ व 205 – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध केला होता. आता या निवडणूकीचे सुधारित प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले असून या निवडणूकीसाठी रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मंगळवार 7 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची बुधवार 8 फेब्रुवारी 2023 रोजी छाननी होईल. शुक्रवार 10 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार, 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होईल. गुरुवार, 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होईल.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री पोटोबा महाराज देवस्थान आणि श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या ठिकाणांना ‘क-वर्ग’ तीर्थस्थळाचा दर्जा
– मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष