‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेण्यासाठी मावळ तालुक्यातील माता-भगिनींनी कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणालाही पैसे देऊ नये, कोणी अशा प्रकारे पैशाची मागणी केल्यास आपल्यापर्यंत माहिती पोचवावी, असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. तसेच या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त माता-भगिनींनी लाभ घ्यावा. काहीही अडचण आल्यास आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील आमदार शेळके यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी एक जुलै पासून मावळ तालुक्यात अर्ज वाटप सुरु करण्यात आले आहेत. हे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह भरुन 15 जुलैपर्यंत दाखल करायचे आहेत. या अर्जासोबत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. उत्पन्नाचा दाखला व अन्य आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी लाभार्थी महिलांकडे काही शासकीय कार्यालयातून अतिरिक्त पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी तालुक्यातील समस्त महिलांना आवाहन करणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. ( Don’t pay anyone to benefit from Ladki Bahin scheme MLA Sunil Shelke )
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महायुतीची सरकारची योजना असून त्यासाठी अर्ज अथवा अर्जासोबत जोडावयाची आवश्यक ती कागदपत्रे संबंधित शासकीय कार्यालयात पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे तालुक्यातील माता-भगिनींनी कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला पैसे देऊ नयेत. कोणाकडेही पैशाची मागणी झाल्यास त्यांनी त्याबाबत आपल्याला माहिती द्यावी,’ असे आमदार शेळके यांनी म्हटले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना राज्य शासनाच्या वतीने दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आवश्यक ती कागदपत्रे, दाखले मिळवण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. या परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आमदार शेळके यांनी दिला.
अधिक वाचा –
– कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय
– मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी
– धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करा, दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा ; खासदार श्रीरंग बारणेंचे पत्र