Dainik Maval News : जे काम पूर्वी सात ठेकेदार साडे पाच कोटी मध्ये करत होते त्या कामासाठी बारा कोटी रुपये एकाच ठेकेदाराला देण्याचा घाट का घातला जात आहे? लोणावळेकर नागरिकांच्या कर रुपी पैशाची ही सपशेल लूट आहे. यासाठी लोणावळा नगर परिषद प्रशासनाकडून विविध विभागातील कामे करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणे कामाची निविदा चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. असे अनेक आरोप करीत ही प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी लोणावळा जागरुक नागरिक यांनी 19 सप्टेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आला आहे. सर्व राजकीय पक्ष व संघटना या उपोषणात सहभागी होणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नागरिकांचा आक्षेप असलेली सदरची निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोणावळा जागरुक नागरिक यांनी निवेदनाद्वारे 9 सप्टेंबर रोजी लोणावळा नगर परिषदेला देण्यात आला होता. त्यानंतर जागरूक नागरिक शिष्टमंडळाने मुख्याधिकारी तथा प्रशासक यांची भेट घेत त्यांना याबाबत विनंती देखील केली होती. याशिवाय बुधवारी आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन त्यांना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र असे असताना देखील आज गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी सदर कामाची वर्क ऑर्डर बीव्हीजी कंपनीला देण्यात आली आहे. लोणावळा शहरातील जागरूक नागरिक, सर्व राजकीय पक्ष, मावळचे आमदार या सर्वांनी याबाबत लेखी निवेदने देऊन व विनंती करून देखील प्रशासन कोणालाच दाद देत नसल्याने जागरूक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
लोणावळा शहरात स्वच्छते बाबतची अनेक कामे, उदा. घरोघरी घंटागाडी मार्फत कचरा गोळा करणे, प्रभाग स्वच्छता, पाणी विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ, कचरा डेपो येथे ओला व सुका कचरा वेगळा करणे, सामुदायिक व सार्वजनिक शौचालय स्वच्छता, धूर व कीटकनाशक फवारणी, नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी पोकलान मशीन व डंपर, शासकीय इमारती व कारंजे साफसफाई या कामांसाठी ठेकेदारी पद्धतीने मनुष्यबळ घेतले जाते. जागरूक नागरिक म्हणाले, पूर्वी लोणावळा नगर परिषद या कामांच्या वेगवेगळ्या निविदा काढत काम करून घेत होती. सात ठेकेदार ही कामे 5.50 कोटी रुपयांत करत होते. आता त्याच कामासाठी एकच निविदा मागवण्यात आली असून ते काम एका विशिष्ट कंपनीला देण्यासाठी निविदेमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कामाचा दर देखील 5.50 कोटी वरून जवळपास 12 कोटी रुपये करण्यात आला असल्याचा लोणावळा जागरूक नागरिक यांचा आरोप आहे.
सदरचे काम एका विशिष्ट कंपनीला मिळावे याकरिता अधिकारी वर्गाने एक गुण तक्ता तयार करत त्या संस्थेच्या पारड्यात मते टाकली आहेत. हा सर्व प्रकार आकलन शक्तीच्या बाहेरील असून या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा जागरूक नागरिकांचा आरोप आहे. ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे ती कंपनी समाधानकारक काम करत नसल्याने अनेक नगरपालिकांमधून काळ्या यादीत टाकली गेली असल्याचा जागरूक नागरिकांचा आरोप आहे. अशा कंपनीला काम देणे म्हणजे लोणावळाकर नागरिकांना समस्येची खाईत टाकण्याचा प्रकार असल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. लोणावळ्यातील सर्व पक्षीय प्रमुख व जागरूक नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय प्रशासनाने घेऊ नये अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली होती. याकरिता मा. जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी व मावळचे आमदार यांना देखील निवेदने देण्यात आली आहेत.
लोणावळा नगर परिषदेने सदरची निविदा प्रक्रिया राबवताना शहर स्वच्छता हा हेतू डोळ्यासमोर ठेवत पूर्वी असलेल्या मनुष्यबळात वाढ केली असल्याने दरात वाढ झालेली दिसत आहे. निविदा प्रक्रिया ही नियमाप्रमाणे करण्यात आली आहे. येत्या 14 सप्टेंबर पासून नवीन ठेकेदाराला काम करण्याबाबतचा आदेश देण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अधिक वाचा –
– इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मानले खासदार बारणेंचे आभार ; संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला
– आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News
– पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News