Dainik Maval News : माणसे पैशाने मोठी असण्यापेक्षा कर्तुत्वाने मोठी असावी. आयुष्यात चांगले वागा, शेवटी हिशोब देऊन जायचे आहे. असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी मावळवासियांना केले.
वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त व माजी सरपंच दिवंगत सोपानराव म्हाळसकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनसेवेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व पंचक्रोशीतील वारकरी, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी वैराग्य मूर्ती हभप शंकर महाराज मराठे, हभप पंकज महाराज गावडे, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, हभप तुषार महाराज दळवी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
- ह.भ.प. देशमुख महाराज म्हणाले, की,संत हे वारकरी संप्रदायाचे प्राण आहेत.संतांच्या विचाराशिवाय कलियुगातील मनुष्य जगू शकत नाही.अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते. आणि ज्ञानापेक्षा देवाचे ध्यान श्रेष्ठ आहे.कर्म हाच देव आहे असे सांगत आत्मा एकच आहे आणि तो नित्य आहे. मरताना चैतन्य जाते, देह जात नाही,शरीर जात नाही आणि आत्माही जात नाही. मात्र; चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे स्वर्ग,नरक करीत राहू नका, फक्त भजन करीत रहा ! असे आवाहन हभप देशमुख महाराजांनी यावेळी केले.
अंगातील ताकद आणि खिशातील पैसा संपला की, तुमचे सर्व संपते, सत्तेच्या,पैशाच्या व दडपशाहीच्या जोरावर माणसे काहीही करू शकतात, मात्र, काळ आणि मृत्यू या दोन्हीच्या विरोधात जगातील कोणीच काही करू शकत नाही. नाही वशिला चालत, अन नाही पैसाही चालत. तसेच प्रत्येकाचाच काळ असतो. या विश्वातील पहिली क्रांती तुकाराम महाराजांचे ‘ वैकुंठ गमन ‘ होय! तोही काळ आहे. दमयंती- नळ राजा, हाही काळ आहे. काळाच्या विरोधात वागू नका असेही देशमुख महाराज यावेळी म्हणाले.
- माणसांवर संकट नाही, धर्मावर संकट आहे. विकास आणि धर्म या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. आता माणसे बाहेरून श्रीमंत झाली आहेत. आणि आतून दुबळी झाली आहेत. अर्थात माणसे बाह्य जीवन सुखी दाखवतात आणि घरात काय अवस्था आहे? आम्ही पैशाच्या घमंडीत जगतोय हे योग्य नाही, असेही हभप देशमुख महाराजांनी उपस्थितांना फटकारले.
जोपर्यंत शरीर आणि मन यांना नियंत्रित करीत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी जीवन जगू शकत नाही. सोपान अण्णांनी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याचा वडगावकरांनी वारसा हा पुढे चालू ठेवावा असे आवाहनही हभप देशमुख महाराजांनी यावेळी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates