माजी राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे मावळ विधानसभेचे दोन वेळचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा दिनांक 31 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांचा यंदाचा वाढदिवस हा लोकसभा निवडणूकीपूर्वीच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे बाळा भेगडेंच्या समर्थकांनी शुभेच्छांची बॅनरबाजी करताना निवडणूकीचा धागा पकडल्याचे दिसत आहे. संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात बाळा भेगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर त्यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय. भेगडे समर्थकांच्या या फ्लेक्सबाजीमुळे सध्याचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे मात्र टेन्शन वाढले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटाचे) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे खासदारकीची हॅट्रीक करण्यासाठी पुन्हा एकदा मावळ लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तशी इच्छा त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. दुसरीकडे मावळ विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनीही ह्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा सांगितला आहे. शिवसेना ठाकरे गट, मनसे ह्या पक्षांनीही मावळ लोकसभेसाठी तयारी सुरु केलीये. तर, मिशन 40+ च्या निमित्ताने भाजपानेही मागील अनेक महिन्यांपासून मावळ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय. ही सर्व पार्श्वभूमी पाहता महायुती आणि महाविकासआघाडी दोन्हीकडे मावळ लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 Former MLA State Minister Bala Bhegde Birthday Banner 31st December )
- ह्या सर्व परिस्थितीत भाजपाचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात अनेक फ्लेक्सवर त्यांना उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय. मावळ लोकसभेत असलेल्या सहापैकी तीन मतदारसंघ घाटाखाली आहेत, तिथेही भाजपाकडून अनेक नेते इच्छुक आहेत. भाजपाकडून या मतदारसंघात इच्छुक असणाऱ्यांची संख्या पाहता आणि विद्यमान खासदारांचा उमेदवारीचा निश्चय पाहता, मावळ लोकसभेवरून महायुतीत वाद होण्याची चिन्ह जास्त दिसतायेत.
एकूणच मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कुणाला मिळणार? कोण कोण बंड करणार? निवडणूकीचं गणित कसं असेल? हे आगामी काळात दिसेलच, पण सध्या तरी बाळा भेगडे यांच्या भावी खासदारकीच्या फलकामुळे खासदार बारणेंचे टेन्शन वाढवल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दादा गट आणि साहेब गट, शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट यासह आता भाजपा, मनसे यांनीही मावळ लोकसभेसाठी तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरु असून पारडे जड असणाऱ्या उमेदवाराचा शोध घेतला जातोय. त्यामुळे मावळ लोकसभेत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अटितटीची किंवा प्रबळ अपक्ष उमेदवार असल्यास तिरंगी चौरंगी अशी तुल्यबळ लढत होऊ शकते, हे निश्चित.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ‘पाऊणे दोन कोटींची चूक’, प्रकरण हलक्यात न घेता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
– श्रीविठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन
– बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई