उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात झटका बसताना दिसत आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे – पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वाटेवर असल्याच्या खात्रीशीर चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. त्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसात ते त्यांचा निर्णय घेऊन शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. खासदारकी लढवण्यासाठी संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याचे चर्चिले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संजोग वाघेरे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण दिले आहे. “मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही माझी सदिच्छा भेट होती. माझी अपेक्षा आमदार किंवा खासदार होण्याची आहे. मी 2014 पासून खासदारकीचा प्रयत्न केला. तेव्हापासून मी तिकीट मागत होतो. यावेळी मी मावळ मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केलीये. आता मी अजितदादांच्या सोबत आहे, पण मावळ मतदारसंघ शिंदे गटाला सुटल्यामुळे मी ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात येण्याची ऑफर दिली. मी त्यांच्याजवळ उमेदवारीची मागणी केली आहे. मी मतदारसंघात कार्यकर्त्यांशी याबाबत बोलणार असून पुढचा निर्णय घेणार आहे,” असे संजोग वाघेरे यांनी सांगितले. ( Maval Lok Sabha Election NCP Leader Sanjog Waghere will join Shiv Sena Uddhav Thackeray Party )
तसेच वाघेरे म्हणाले की, “मला अजितदादांकडून निरोप आला तर मी त्यांची भेट घेईन. ते माझे नेते आहेत. माझी पक्षातील कोणावरही तक्रार नाही, मला लोकसभा लढायची आहे. यासाठी मी पक्ष सोडणार आहे.” संजोग वाघेरे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. भविष्यात आता मावळ लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात कोण कोण दिसणार आणि त्यादृष्टीने काय काय राजकारण घडणार, हे येत्या काळात दिसेलच.
अधिक वाचा –
– धाडसाचं कौतूक, धैर्याला सॅल्यूट.! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सर्पमित्रांकडून जाळीत अडकलेल्या विषारी नागाला जीवदान
– इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आढावा बैठक; इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – मंत्री दीपक केसरकर
– श्री फडणवीस आता बनले डॉक्टर फडणवीस! जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट