माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी क्रशर व्यावसायिकांकडून माझ्या जीवाला धोका असून सुरक्षा वाढवावी, अशा मागणीचे पत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले. या पार्श्वभूमीवर बाळा भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे वक्तव्य मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे. ( Maval MLA Sunil Shelke Letter Statement About Safety Of Bala Bhegade )
पुणे जिल्ह्यातील गौण खनिज व्यावसायिक अवैध उत्खनन करत आहेत, या विरोधात हरित लवादात केस दाखल केल्याने या लोकांपासून धोका उत्पन्न होण्याची भीती भेगडे यांनी व्यक्त केली होती, याच अनुषंगाने आमदार शेळके यांनी वक्तव्य केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“गेल्या अनेक वर्षांपासून क्रशर व्यावसायिक शासकीय अटी शर्तीनुसारच व नियमांच्या अधीन राहूनच व्यवसाय करत आहेत. आपण मागील दहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होता. परंतू त्यावेळी कोणी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे तुम्हाला आढळले नाही. परंतू आता राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर अचानक हे व्यावसायिक अवैधरित्या व्यवसाय करत असल्याचा दृष्टांत तुम्हांला कसा काय झाला?” असा सवाल आमदार शेळके यांनी केला आहे. तसेच, स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याकरिता व चर्चेत राहण्याकिरता सुरू असलेला हा खटाटोप तर नाही ना, असा प्रश्नही सवाल आमदार शेळके यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातील क्रशर व्यावसायिकांना माफिया हा शब्द वापरणे योग्य नाही. क्रशर व्यावसायिक माफिया नसून कायदेशीरपणे शासकीय नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करणारे स्थानिकच आहेत. त्यामुळे तुमच्या जीवाला कुठलाही धोका असणार नाही आणि तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे असे पत्रव्यवहार करून क्रशर व्यवसायिकांची बदनामी करु नये, असे शेळके यांनी म्हटले आहे.
करोडो रुपयांचे कर्ज घेऊन पुणे जिल्ह्यात क्रशर व्यवसाय करणारे स्थानिक भूमिपुत्र असुन गुन्हेगार नाहीत, याचे भान बाळा भेगडे यांना असायला हवे. स्थानिक व्यावसायिकांवर असे आरोप करताना विचार करायला हवा होता, असे देखील शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड
– Video : मावळ तालुक्यात भात कापणीला वेग, शेतकऱ्यांकडून यंत्राद्वारे भात कापणीस प्राधान्य