मावळ तालुक्याची 2023-24 या आर्थिक वर्षातील आमसभा आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 15 फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात होणार आहे. आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषदेत या आमसभेबाबत पूर्वीच घोषणा केली होती. मावळ तालुक्यातील सर्व गावांसाठीचे ‘शासन आपल्या दारी’ अभियान पार पडल्यानंतर आता दिनांक 15 फेब्रुवारीला मावळ तालुक्यातील मागील पाच वर्षातील ही पहिली आमसभा होणार आहे. परंतू आमसभा म्हणजे काय? त्याचे कामकाज कसे चालते? याबाबत नागरिकांना तितकी माहिती नाही. त्यामुळे या लेखातून आपण आमसभा बद्दल विस्तृतरित्या समजून घेणार आहोत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
आमसभा म्हणजे काय?
भारत हा खेड्यांचा अर्थात गावांचा देश आहे. अनेक गावे मिळून हा देश बनलेला आहे. गावखेड्यांच्या व्यवस्थेला देशात पंचायतराज म्हणून ओळखलं जातं. ग्रामपंचायत हा या पंचायतराजचा मुलाधार आहे. ग्रामपंचायतचे कामकाम जसे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्राम सदस्य मिळून करतात आणि त्यांच्यावर ग्रामसभेद्वारे संपूर्ण मतदार अंकूश ठेवत असतात, अगदी तसेच विधानसभा मतदारसंघाचे कामकाम हे आमदार, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून करत असतात. आणि तालुक्यातील अथवा विधानसभेतील सर्व मतदार आमसभेद्वारे संबंधितांवर अंकूश ठेवतात. परंतू ग्रामसभा आणि आमसभा यांचे कार्यपद्धती पूर्णतः वेगळी असते. महत्वाचा फरक म्हणजे घटनेनुसार ग्रामसभेचे जसे नियम आहेत, तसे आमसभेबाबत नाही. म्हणजे आमसभा बोलावणे आणि त्याचे कार्यचलन करणे यासाठी कुठलेही बंधन नसते. परंतू आमसभा बोलावणे आणि तिची कार्यपद्धती याबाबत काही नियम आहेत.
आमसभा कोण बोलवतो?
तसे पाहता आमसभा ही पंचायत समितीची असते. पंचायत समिती आमसभेचे संपूर्ण आयोजन नियोजन करत असते. आणि गटविकास अधिकारी आमसभेचे सचिव या नात्याने सर्वविभागांशी संपर्क करत असतात. परंतू तालुक्याचे अथवा विधानसभेचे आमदार हे आमसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि आमदार यांनी वेळ दिल्यानंतर किंवा त्यांनी सुचना केल्यानंतरच आमसभा बोलवली जाते.
आमसभेचे कामकाज कसे चालते?
आमसभेत आपण वर सांगितल्याप्रमाणे सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचार आणि मतदार नागरिक असतात, जे तालुक्यातील अथवा विधानसभा क्षेत्रातील सर्व दूर भागातून आलेले असतात. आमदार हे या आमसभेचे अध्यक्ष असल्याने ते सर्वोच्चस्थानी असतात. अशात प्रत्यक्ष आमसभेच्या कामकाजात प्रत्येक विभागाचा मागील वर्षाच्या कामाचा आढावा जाहीर करणे आणि येत्या वर्षातील कामाचे नियोजन जाहीर करणे, हे काम प्रत्येक विभागनिहाय आमसभेत होते. याचा अर्थ तालुक्यातील जनतेला प्रत्येक विभागाच्या कामाचा गत वर्षीचा आढावा समजतो आणि भविष्यात होणाऱ्या कामांची मागिती होते. ही प्रक्रिया सर्वविभागनिहाय होत असते.
नागरिकांचा आमसभेतील सहभाग –
आमसभेला तालुक्यातील म्हणजेच विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार उपस्थित राहू शकतात किंबहुना राहतात. अशावेळी विभागांच्या आढावा सादर झाल्यानंतर नागरिक प्रत्येक विभागानुसार आपले प्रश्न उपस्थित करू शकतात. तसेच आपले मुद्दे मांडू शकतात. अध्यक्ष म्हणून आमदार यांच्या उपस्थितीत हे सर्व कामकाज पाहिले जाते.
अध्यक्ष म्हणून आमदार महोदयांचा सहभाग –
आमदार हे आमसभेचे अध्यक्ष असतात. संपूर्ण आमसभा ही त्यांच्या सुचनेने होत असल्याने संपूर्ण आमसभेत ते सक्रीय सहभाग घेतात. विभागांचा आढावा सादर होत असताना ते आपल्या सुचना देऊ शकतात. तसेच नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान विभागीय अधिकाऱ्यांकडून होत नसल्यास ते स्वतः हस्तक्षेप करू शकतात.
आमसभेचे फायदे –
आमसभा ही एका आर्थिक वर्षाकरिता असते. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात आमसभा होणे गरजेचे आहे. आमसभेमुळे जनतेला प्रत्यक्षात सर्व विभागांच्या कामांची माहिती होते आणि कामात पारदर्शकता निर्माण होते. तसेच जनतेला थेट अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधता येतो आणि आपले प्रश्न, समस्या मांडता येतात.
मावळ तालुक्याची आमसभा –
गुरुवार (दि. 15 फेब्रुवारी) रोजी वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये मावळ तालुक्याची आर्थिक वर्ष 23-24 ची आमसभा होणार असल्याची माहिती मावळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (प्रभारी) सुधीर भागवत यांनी दिली. आमसभेला तहसीलदार विक्रम देशमुख यांसह तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत, आणि आपापल्या विभागाच्या कार्याचा आढावा जनतेसमोर सादर करणार आहेत. तालुक्यातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी आमसभेचे अध्यक्ष आणि आमदार या नात्याने आणि गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांनी आमसभेचे सचिव या नात्याने नागरिकांना केले आहे. बऱ्याच वर्षांनंतर तालुक्याची आमसभा होत असल्याने मावळकरांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
अधिक वाचा –
– पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी जमा होणार 16वा हप्ता, लाभार्थ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिम । PM Kisan Yojna
– वडगाव शहरातील 300 मुलांना मोरया प्रतिष्ठानने घडवली तोरणा किल्ल्याची सफर । Vadgaon Maval
– मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुधवारी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात भव्य रॅलीचे आयोजन, पाहा रॅलीचा मार्ग