मावळ तालुक्यात ग्रामीण भागात तळागाळात पोहोचलेले अध्यक्ष असा लौकिक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (दादा गट) संतोष मुऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे दिला आहे. संतोष मुऱ्हे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
संतोष मुऱ्हे यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होत आहे. तालुक्यातील पक्षातील गटबाजीला कंटाळून मुऱ्हे यांनी राजीनामा दिल्याचे गंभीर आरोप होत आहेत. संतोष मुऱ्हे यांनी मावळ तालुक्याचे दोन वेळा युवक अध्यक्ष पद सांभाळले होते. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष असताना पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी यांचा स्वतंत्र कार्यभार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर सोपवला होता. (Maval taluka NCP Leader Santhosh Murhe Resigned)
- सोमाटणेचे अध्यक्ष ते पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत आपल्या कामाने आणि कार्यकर्त्यांप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेने संतोष मुऱ्हे पोहोचले होते. मागील लोकसभेच्या निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. मावळ तालुक्यातील संतोष भेगडे, संतोष मुऱ्हे, सचिन घोटकुले, सुनील दाभाडे या चौकडीचे नामकरण ‘फोर एस’ असे झाले होते. त्यातील एक S कमी झाल्याने ताकद कमी झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून संतोष मुऱ्हे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत होते. त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना दोन वेळा पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी यांचा कार्यभार त्यांनी चांगला सांभाळला होता. हे पाहून 2014 ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेसाठी उमेदवारी दिली होती. परंतू ज्येष्ठ नेते माउली दाभाडे यांच्यासाठी त्यांनी उमेदवारी सोडली आणि पक्षाचे कार्य करीत राहिले. त्यामुळे अशा कार्यकर्त्यासाठी आता अजित दादा काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा –
– महत्वाचे! देहू नगरपंचायतीसाठी 24 कोटी 26 लाखाचा निधी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke
– औंध येथील जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन
– पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोमाटणे गावासाठी मोठा निधी; बाळा भेगडेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन