Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला आज, शनिवार (दि.23 नोव्हेंबर) रोजी तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मुख्य निवडणूक केंद्रामध्ये सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. एकूण 29 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. तर अंदाजे दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होइल, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली आहे.
मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल, पोस्टल मतांच्या मोजणीसाठी दोन टेबल आणि सैनिकांच्या मतमोजणीसाठी एक टेबल लावण्यात येणार आहे. पोस्टल मतमोजणीने मतमोजणीची सुरुवात होणार आहे. तर 14 टेबलवर 29 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. एका फेरीसाठी अंदाजे 15 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात यंदा विक्रमी 72.59 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदारसंघातील एकूण 3 लाख 86 हजार 172 मतदारांपैकी 2 लाख 80 हजार 319 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 44 हजार 214 पुरुष, 1 लाख 36 हजार 102 महिला तसेच इतर 3 मतदारांचा समावेश आहे.
आज भैरवनाथ जयंती
आज कार्तिक कृष्ण अष्टमी अर्थात कालाष्टमी आणि भैरवनाथ जयंती आहे. मावळात जवळपास प्रत्येक गावात भैरवनाथाचे मंदिर किंवा भैरवनाथांचा अवतार असलेल्या देवदेवतांचे मंदिर असल्याचे दिसते. मावळ मतदारसंघातील प्रमुख उमेदवार सुनिल शेळके आणि बापूसाहेब भेगडे हे तळेगाव दाभाडे शहरातील रहिवासी असून मतमोजणी तळेगावातच होणार आहे. तसेच तळेगाव शहराचे ग्रामदैवत हे श्री डोळसनाथ महाराज असून डोळसनाथ महाराज हे भैरवनाथांचे अवतार मानले जातात. त्यामुळे आजच्या दिवशी भैरवनाथांचा आशीर्वाद नेमका कुणाला मिळणार हे पाहावे लागेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : निकाल ऐकायला तळेगावात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल, लगेच पाहा । Maval Vidhan Sabha
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, वाचा अधिक
– बापूआण्णा की सुनीलआण्णा, मावळात कुठल्या आण्णाचं पारडं ठरतंय जड ? पाहा काय आहे कौल । Maval Vidhan Sabha