“महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतच 1 कोटींहून अधिक भगिनींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रसारमाध्यमांमध्ये तद्दन खोट्या, निराधार बातम्या पसरवून ‘फेक नॅरेटीव्ह’ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘फेक नॅरेटीव्ह’ निर्माण करण्याच्या प्रयत्नांनाला राज्यातील जनता, माता-भगिनी बळी पडणार नाहीत. त्या आमच्यासोबतंच आहेत आणि राहतील,” असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online application filed by 1 crore women )
राज्यातील काही वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध’ आणि ‘योजनेसाठी निधी कुठून आणणार?’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्या तद्दन खोट्या, कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी विसंगत, ‘फेक नॅरेटीव्ह’ निर्माण करण्यासाठी राजकीय हेतूने पसरवण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. वित्त व नियोजन, संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षातील उर्वरीत नऊ महिन्यांसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही.
महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे. राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर झाल्यानंतर तिला राज्यभर उदंड प्रतिसाद मिळत आहे. शासकीय यंत्रणा, राजकीय-सामाजिक-स्वयंसेवी संघटनांकडून शहरात आणि गावोगावी शिबिरं आयोजित करुन अर्ज भरुन घेतले जात आहेत. योजना जाहीर झाल्यानंतर गेल्या महिनाभरात राज्यात फिरताना गावागावातल्या लाभार्थी माता-भगिनींकडून मिळणारा प्रतिसाद, प्रेम आश्चर्यचकित करणारं आहे. या योजनेचं हे यश बघून विविध माध्यमातून खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेसारखी कुठलीही नवीन योजना जाहीर करत असताना त्या योजनेची अंमलबजावणी, कार्यान्वयन चांगल्या पद्धतीने व्हावं. प्रशासकीय खर्च कमी होऊन अधिकाधिक निधी लाभार्थी घटकांसाठी उपयोगात यावा, असा वित्त विभागाचा प्रयत्न असतो. त्यासाठी काही उपाययोजना सूचवल्या जातात. त्या सूचनांचा संदर्भ बदलून, चुकीचा अर्थ काढून माध्यमांमध्ये वित्त विभाग आणि राज्य शासनाबद्दल गैरसमज पसरवण्याचा, ‘फेक नॅरेटीव्ह’ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना राज्यातील सुज्ञ जनता आणि पहिल्यांदाच अशा महत्वकांक्षी योजनेचा लाभ होणार आहे त्या माझ्या माता-भगिनी बळी पडणार नाहीत, याची खात्री आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला वित्त विभागासह राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण असूच शकत नाही. उलट या योजनेसाठी लागेल तो निधी देण्यास वित्त विभाग कटीबद्ध आहे. प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा नकारात्मक बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे ‘गुरुपूजन’ सोहळा उत्साहात । Maval News
– सासूने आपल्यावर तंत्र-मंत्र केल्याचा सुनेचा आरोप, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल । Talegaon Dabhade
– मोठी बातमी ! मावळमधील ग्रामीण भागातील ‘या’ 10 ठिकाणच्या रस्ते विकासकामांना प्रशासकीय मान्यता, पाहा यादी । Maval News