महाराष्ट्रात जी लोकसंस्कृती आहे, त्यामध्ये 80 – 90 च्या दशकात नवरात्रीच्या दिवसात घरोघरी भोंडला केला जात असे. आजच्या पिढीला हा शब्दच माहीती नसावा, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यातील भोंडल्याची गाणी आणि खिरापत याचा ते आनंद घेऊ शकत नाहीत. पण ज्यांचा जन्म 60 ते 80 या काळात झाला आहे, त्यांनी आपल्या लहानपणी याचा आंनद मनमुराद घेतला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संध्याकाळी पाटावर रांगोळीने हत्तीचे चित्र काढायचे. ते मधोमध ठेवून त्या भोवती फेर धरुन भोंडल्याची गाणी विशिष्ट चालीमध्ये म्हणायची. मग यजमान घरात केलेली भोंडल्याची खिरापत ओळखायची. जोपर्यंत खिरापत ओळखळी जात नाही, तोपर्यंत पदार्थांची नावे घेत राहायचे. आपण केलेली खिरापत लवकर ओळखता येऊ नये म्हणून प्रत्येक गृहिणीचा प्रयत्न असायचा. खिरापत ओळखली गेल्यावर एकच जल्लोष होऊन प्रसाद वाटप होत असे. ( Navratri Festival and Bhondla Information in marathi about History and Significance know Marathi Culture )
बालपणीच्या रम्य आठवणीमधील भोंडला आज काळाच्या ओघात बंद पडला आहे. हा काळ होता टिव्ही, मोबाईल पासून दूर असलेल्या मुलांचा. कॉम्युेरटर हा प्रकार ही तेव्हा कोणाला नावानेही माहित नव्हता. घरात टिव्ही रेडिओ सुध्दा नव्हते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ ही घराबाहेरच खेळण्याची असायची. जेव्हा महाराष्ट्रात गरबा हा फक्त गुजराती लोकच खेळत होते तेव्हा मराठी कुटुंबात भोंडला हा प्रकार लोकप्रिय होता.
भोंडला जेथे मांडला जाई ती जागा शेणाने सारवली जाई. पाटावर गल्लीतील कोणाकडून सुबक हत्तीची रांगोळी काढुन घेतली जाई. मधोमध पाट ठेवुन संख्येप्रमाणे फेरा धरताना आपल्या जवळच्या मैत्रिणीचा हात आपल्या हातात असावा हा अट्टहास असे. पाटावर हत्तीच का काढत, याची कोणाला ही माहिती नसे पण हा प्रश्न ही त्या काळी कोणाच्या मनात येत नसे. हत्तीचे हे एक हस्त नक्षत्राचे प्रतिक आहे. अश्विन महिन्यात हस्त नक्षत्र येते. त्याचा पाउस हा हस्ताचा पाऊस म्हणून ओळखला जातो. भोंडला हे एक व्रत म्हणून करण्याचा प्रकार आहे. ही आळवणी आहे हस्ताच्या पावसाची. हस्तात हत्ती बुडेल इतका पाऊस पडू दे म्हणजे खुप पाणी मिळेल हा त्यातील भाव आहे.
- भोंडल्याच्या गाणी ही वैशिष्टपूर्ण आहेत. भोंडल्यास काही भागात “हदगा” असे ही म्हंटले जाते. त्यामुळे भोडल्याच्या गाण्यांना हदग्याची गाणी ही म्हंटले जाते. हदगा हे एका वृक्षाचे सुध्दा नाव आहे, त्याचे ही पर्जन्याचे व्रत केले जाते. भोंडला हे ही हस्त नक्षत्राच्या सुरुवातीस सुरु होणारे एक खेळून करावयाचे व्रतच आहे. यात नाते संबंधा सोबत पाण्याची आळवणी आहे. हि गाणी लोक गीते आहेत. याचे कवी कोण हे माहित नाही. यात वेगवेगळे संदर्भ येतात. यातील यमक आणि शब्द यांची रचना अशी केली आहे की, ती विशिष्ट चालीत म्हणता म्हणता आपोआप पाठ होतात. शब्दांची पुनरावत्ती करुन रचना केली आहे. त्यामुळे त्याचा क्रम लक्षात रहातो. त्या त्या काळात जे शब्द वापरले जात त्याचा खुबीने वापर केला आहे. आज आपण हे सर्व विसरत चाललो आहे.
“ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा”
गोदातीरावरील उमेचा पती शिव आणी पार्वती सांगताना गीतामधून उमाजी नाईक या क्रांतीकारकाची आठवण करुन दिली आहे.
“एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं । दोन लिंब झेलूं बाई, तीन लिंबं झेलूं”
त्या काळाचा खेळाचे वर्णन आहे
“नणंदा भावजया दोघीजणी । घरात नव्हतं तिसरं कोणी । शिंक्यावरचं लोणी । खाल्लं कोणी?”
नणंद भावजय, सासू सूना, दिर वहिनी यांचे नाते व नात्यातील ओलावा या गीतामुधून सांगितला आहे.
“आज कोण वार बाई । आज कोण वार? आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार”
या गाण्यातून मुलांना शिक्षण दिले जाते
“अक्कणमाती चिक्कणमाती,
अशी माती सुरेख बाई,
ओटा जो घालावा
असा ओटा सुरेख बाई,
जातं ते रोवावं ।
दीड दमडीचं तेल आणलं
मामंजींची शेंडी झाली
भावोजींची दाढी झाली…”
असे किती तरी गाणी आपल्या लहानपणाची ओलसर आठवण आहे. काळाप्रमाणे अनेक संदर्भ बदलत चालले आहेत. आपण किती तरी गोष्टी पूर्णपणे विसरुन चाललो आहोत. आपल्या पूर्व आयुष्यातील आनंद मिळून देणा-या गोष्टी याही काळात आपणांस नक्कीच आनंद देऊ जातील.
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी
आडात पडली सुपारी
आमचा भोंडला दुपारी
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला संध्याकाळी
आडात पडली कात्री
आमचा भोंडला रात्री
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला
आज पुन्हा आडात पडलेला भोंडला पुन्हा वर काढला पाहिजे. आपल्या आपल्या गावांत, वाडीत, नगरात, सोसायटीत पुन्हा एकदा भोंडला मांडला पाहिजे.
लेखक – अजित दि देशपांडे (भारतीय विद्या विशारद)
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके बनणार मंत्री? कार्यकर्त्यांकडून तालुक्यात बॅनरबाजी, वाचा काय आहे प्रकरण…
– धक्कादायक! लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात शिरला ट्रक
– सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळमधील सोसायटी संचालकांचा ‘सह्याद्री फार्म्स’ इथे अभ्यास दौरा