यंदा झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अवघा एक खासदार निवडून आला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तब्बल आठ खासदार निवडून आले. त्यामुळे आपसूकच अजित पवार यांची राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे. राज्यात त्यामुळे शरद पवार यांच्या दिशेने राजकारणाचे वारे फिरू लागल्याची चर्चा होत असून अजित पवार गटाचे अनेक आमदार लवकरच शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चाही होत आहे. या चर्चेदरम्यान मावळ तालुक्यात शनिवारी (दि. 6 जुलै) असं काही घडलं की अजितदादांचे खास विश्वासू आमदार असलेले सुनिल शेळके चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्री एकविरा देवस्थान ट्रस्टची निवडणूक आणि आमदार सुनिल शेळके –
शनिवारी कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या दोन विश्वस्तांची निवड प्रक्रिया पार पडली. 2023 पासून प्रलंबित असलेल्या या प्रक्रियेत शनिवारी प्रत्यक्ष मतदान झाले आणि आश्चर्यकारकरित्या शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे निवडून आले. खास बाब म्हणजे देवस्थानच्या सातपैकी 5 विश्वस्तांनी बाळ्यामामा म्हात्रे यांना एकमुखी मतदान केले आणि हे सर्वजण आमदार सुनिल शेळके यांचे समर्थक होते. विशेष म्हणजे ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होत असताना आमदार शेळके तिथे ठाण मांडून बसले होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या खासदारासाठी अजित पवारांचा आमदार मैदानात उतरल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. ( NCP Ajit Pawar Maval MLA Sunil Shelke Work For Sharad Pawar MP Suresh aka Balyamama Mhatre In Ekvira Devi Trust )
सुनिलआण्णांनी शब्द दिला होता – सुरेश म्हात्रे
भाविकांतून विश्वस्त म्हणून देवस्थानच्या ट्रस्टवर निवडून आल्यानंतर विश्वस्त सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ‘आज माझी विश्वस्त म्हणून नेमणूक झाली. त्यामुळे आदरणीय आमदार सुनिल शेळके यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा जून 2023 मधील विषय होता. 18 जूलै रोजी आम्ही सर्वांनी अर्ज भरले होते. मात्र, त्यानंतर कोर्टातून काहींना अडचणी आल्याने निवडणुकीला उशीर झाला. सुनिलआण्णांनी मला शब्द दिला होता. त्यामुळे सर्व विश्वस्तांनी मला आणि दीपक अण्णांना सातच्या सात मते दिली. त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आई एकविरा हे फार मोठे देवस्थान आहे. त्यामुळे येथील समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू,’ असे म्हात्रे म्हणाले.
आम्ही स्वतंत्र पक्षात पण आमचं प्रेम वेगळे – सुनिल शेळके
निवड प्रक्रियेनंतर आमदार सुनिल शेळके यांनी नवनिर्वाचित विश्वस्त सुरेश म्हात्रे आणि दीपक हुलावळे यांचे अभिनंदन केले. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना, ‘आम्ही स्वतंत्र पक्षात असलो तरी आमचं प्रेम वेगळं आहे. त्यांना मी शब्द दिला होता, तो पाळला.’ असे सुनिल शेळके म्हणाले.
आमदार सुनिल शेळके शरद पवार यांच्याकडे जाणार?
राज्यात सध्या सुरू असलेली चर्चा आणि देवस्थान विश्वस्त निवडणूकीत आमदार सुनिल शेळकेंनी सुरेश म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न, यामुळे आमदार सुनिल शेळके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होत असून त्याबद्दल शेळके यांना विचारले असता, ‘मग मी कधी जाऊ, त्यांना विचारलं पाहिजे मी कधी येऊ?’ अशी मिश्किल टिपण्णी केली. त्यावर एकच हशा पिकला. तसेच पुढे बोलताना सुनिल शेळके यांनी, ‘ मी बऱ्याचदा सांगितले आहे की माझ्या मायबाप जनतेने गेल्या साडेचार वर्षांमध्ये माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने जर कोणी सोडवले असतील तर ते अजितदादांमुळे सुटले आहेत. त्यामुळे माझा जर काही वैयक्तिक स्वार्थ असेल तर मी त्यांना सोडून इकडे तिकडे उड्या मारेल’, असे सांगितले.
कोण आहेत सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे भिवंडी मतदारसंघाचे खासदार आहे. त्यांनी यंदा झालेल्या लोकसभा निवडणूकीत केंद्रीय मंत्र्याचा पराभव केला, त्यामुळे ते जायंट किलर ठरले होते. म्हात्रे यांनी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा पराभव केला आहे.
अधिक वाचा –
– अखेर निवड प्रक्रिया झालीच ! श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि दीपक हुलावळे । Karla News
– भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र आणि वास्तव्याच्या पुराव्याविना मिळणार रेशनकार्ड ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय
– महत्वाचे ! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी बदलल्या, अनेक कागदपत्रांसाठी पर्याय उपलब्ध, जाणून घ्या