Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, अपघातांचे वाढते प्रमाण आणि सामान्य जनतेला भोगावे लागणारे हाल यामुळे आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशन काळात आक्रमक भूमिका घेतली असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. त्यांच्या सोबत आमदार बाबाजी काळे (खेड विधानसभा) आणि माऊली कटके (शिरूर विधानसभा) यांनी देखील सहभाग घेत रस्त्याच्या डागडुजीसाठी तातडीची कार्यवाही करण्याची मागणी केली.
- आमदार सुनील शेळके म्हणाले की, सदर रस्त्यासाठी सुमारे ३२०० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याला किमान तीन ते चार महिने लागणार असून काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाईल. या दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, साईडपट्ट्यांचे मुरमीकरण करणे आणि अपघात प्रवण ठिकाणी सूचना फलक लावणे ही तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना आमदार शेळके म्हणाले की, दररोज हजारो कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या रस्त्यावरून प्रवास करतात. अपुऱ्या देखरेखीतून अपघात होत असून कोणी जबाबदारी घेत नाही. केवळ मोठ्या टेंडर काढून सरकार जबाबदारी झटकत आहे, ही लोकांच्या जिवाशी थट्टा आहे. निविदा प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी तात्काळ डागडुजीचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
- आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी सांगितले की, या रस्त्यावर वर्षभरात दीडशेहून अधिक अपघात घडले असून अनेकांचे प्राण गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर ट्राफिक आणि रस्त्यांची दूरवस्था यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चाकण, शिक्रापूर आणि तळेगाव चौकात अनेक तास ट्राफिकमध्ये अडकून नागरिक त्रस्त झाले आहेत.
आमदार माऊली कटके यांनीही सांगितले की, हा रस्ता तळेगाव, चाकण व शिक्रापूर एमआयडीसी आणि मुंबईशी जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे. अरुंद रस्त्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. रिंगरोड आणि पर्यायी महामार्गांची गरजही त्यांनी अधोरेखित केली. या तिघाही आमदारांनी सरकारला साकडे घालत सांगितले की, मोठ्या औद्योगिक क्षेत्रांना जोडणारे हे रस्ते असून, कामगार आणि शेतकरीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलली जावीत. शासन या तिघा आमदारांच्या ठाम भूमिकेला किती गांभीर्याने घेऊन पुढील कृती काय करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना