Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या माध्यमातून लोणावळा शहरात रविवारी (दि. १८ ऑगस्ट) सकाळी संकल्प नशामुक्ती आणि सुरक्षित पर्यटन या विषयावर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी 9 वाजता लोणावळ्यातील कुमार हॉटेल ते भगवान महाविर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान रॅली काढण्यात आली. लोणावळा शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, वेगवेगळ्या सामाजिक संस्था या रॅलीत सहभागी झाले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सुरक्षित व जबाबदार पर्यटन, नियमांचे पालन, स्वच्छ व सुंदर शहर आणि नशामुक्त युवा पिढी घडविण्याबाबत संदेश दिला. त्यानंतर स्वतंत्र थिएटर, पुणे येथील कलावंतांनी पथनाट्य सादर केले. लोणावळा शहर हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. येथे आल्यानंतर पर्यटकांनी सुरक्षित पर्यटन कशा पद्धतीने करावे याबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली गेली. तसेच यावेळी अनेक अप्रिय घटनांमध्ये आपला जीव धोक्यात टाकून बचाव कार्य करणाऱ्या शिवदुर्ग मित्र या संस्थेला आणि पथनाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोचवण्याचे काम करणाऱ्या स्वतंत्र थिएटर, पुणे यांना सन्मानित करण्यात आले.
लोणावळा शहरात आल्यानंतर पर्यटकांनी येथील निसर्गाचा आनंद घेत असताना स्वतःची सुरक्षितता राखणे हे देखील महत्त्वाचे आहे. याकरिता सर्व पर्यटन स्थळांवर सूचनाफलक लावण्यात आले आहेत. लोणावळा शहर व मावळ तालुक्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी आपल्या सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेमधून हा सदरचा जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला. ( Rally in Lonavala city for awareness of drug addiction and safe tourism )
अधिक वाचा –
– अजितदादांनी शब्द पाळला ! मावळातील 42 हजार भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा
– मावळातील 42 हजार महिलांना मिळाले लाडकी बहीण योजनेचे पैसे ; ज्यांना नाही मिळाले त्यांनी ‘हे’ काम नक्की करा
– बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval