Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मंगरूळ हद्दीत अवैधरित्या वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी संबंधित विभागांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.
- मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील गट क्रमांक ३५ ते ३८ आणि ४१ ते ४९ या वनक्षेत्र आरक्षित भागात झाडांची अवैध वृक्षतोड करून माती, मुरूम व डबराचे उत्खनन झाल्याची तक्रार आली होती. यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी मार्च २०२५ च्या विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्याअनुषंगाने विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांसह आमदार सुनील शेळके, मावळ तालुक्याचे उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले की, वनसंवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब महत्वाची असून या प्रकरणाचा अहवाल तत्काळ द्यावा. तसेच मावळ मतदारसंघातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी. मावळ तालुक्यात खासगी कंपन्यांतील सांडपाण्याची विल्हेवाट योग्य मार्गाने होत असल्याचबाबतची खातरजमा करून त्याचा अहवाल सादर करावा.
पाण्याची सोय न करता सदनिका विक्री बाबत चौकशी करण्याच्या सूचना –
मावळ तालुक्यात अलीकडे मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प उभारले जात असून, अनेक बिल्डरांनी सदनिका बांधून विक्री केली आहे. मात्र, या गृहप्रकल्पांमधील नागरिकांना बोअरिंगच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये दूषित पाण्यामुळे पोटदुखी, त्वचेचे आजार व इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याचे निदर्शनास आले आहे, याबाबतही चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना