Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहरात (ता. मावळ) शनिवारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. एका युवतीला जबरदस्ती कारमध्ये डांबून ठेवत तिच्यावर विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
शनिवारी (दि. २६ जुलै) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (दि. २५ जुलै) रात्री नऊ ते शनिवारी पहाटे दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. कारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गाडी थांबवत तीन नराधमांनी सदर तरुणीवर बला’त्कार केला असल्याचा गुन्हा लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पीडित तरुणी ही तुंगार्ली भागातील नारायणी धाम मंदिर परिसरातील रस्त्याने जात असताना एका कारमध्ये तिला तोंड दाबून जबरदस्तीने बसविण्यात आले.
त्यानंतर आरोपींनी तिचे हात पाय बांधत तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या सर्व प्रकारानंतर सदर मुलीला नांगरगाव येथील एका रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करत दुपारनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार केली आणि आरोपींच्या शोधार्थ रवाना केली. यानंतर बारा तासात या प्रकरणातील एक आरोपी निष्पन्न करत त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामाघरे यांनी माध्यमांना दिली. घटनेचा पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेला आरोपी हा मावळ तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू
– मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा
– सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? श्रावण मासात उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख