Dainik Maval News : मावळ तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, तालुक्यात पोलीस प्रशासनाचा वचक उरला आहे की नाही? असा संतप्त सवाल भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे.
टाकवे बुद्रुक येथे दोन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या भीषण अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला ‘फास्टट्रॅक कोर्टा’त चालवला जावा, अशी ठाम मागणी करत मावळात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिक आणि मुलींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना त्यांनी टाकवे बुद्रुक येथील दोन वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त केला. या घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी उर्से येथे एका परप्रांतीय कुटुंबातील मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर शिळीम येथे आदिवासी कुटुंबातील मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. तर, नुकतीच टाकवे बुद्रुक येथे परप्रांतीय कुटुंबातील चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे तालुक्यात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज
नसरापूर येथील घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून दोन महिन्यांत आरोपीला शिक्षा झाली. मग मावळ तालुक्यात घडलेल्या घटनेतील आरोपीला दोन महिन्यांत शिक्षा का होऊ शकत नाही ? उलट अशा घटनातील आरोपींना तात्काळ शिक्षा झाल्यास असे प्रकार करण्याची हिंमत कोणाची होणार नाही. अशा घटनांमध्ये पीडित कुटुंब परप्रांतीय आहे किंवा गरीब आहे, असा भेदभाव न करता मावळवासीयांनी यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असेही मत देसाई यांनी व्यक्त केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
– विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
– लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास
