Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांनाच महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, मावळ भाजपाचे प्रमुख नेते तथा माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी आणि पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे सोबत इतर काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे जाहीर केले आहेत. तसेच या निवडणूकीत आपण महायुतीच्या उमेदवाराचे नाही तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे तालुक्यातील सामन्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. अशात तळेगाव शहर भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसोबत बोलताना आपली भूमिका जाहीर केली आहे.
तळेगाव शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीलाच आपला पाठिंबा दिला असून आम्हाला पक्षाचा आदेश आला आहे आणि महायुतीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही पक्ष आदेशाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, पक्षाच्या आदेशाचे पालन करून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांचेच काम करणार असल्याचे तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी बाळासाहेब जांभूळकर, रजनी ठाकूर, सुरेश दाभाडे आदी उपस्थित होते.
महायुतीच्या वतीने मावळ विधानसभेसाठी विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या विकास कामांना नजरेसमोर ठेवत दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला विरोध करत भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी यांनी पदांचे राजीनामे देत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढविण्याची घोषणा केलेले संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणाऱ्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ही भूमिका मान्य नाही. असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रामध्ये व देशांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांची महायुती आहे. या महायुतीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आहेत. महाराष्ट्रात देखील महायुतीची सत्ता आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. असे असताना महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नसल्याने पक्षाचा आदेश पाळत तळेगाव शहर भाजपाने महायुतीला मावळात पाठिंबा दिला आहे.
महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांची भेट घेत प्रचाराचे नियोजन करणार असल्याचे संतोष दाभाडे पाटील यांनी यावेळी सांगितले. पक्षाचा आदेश आल्यानंतर आमचे नेते देखील महायुतीचे काम करतील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ विधानसभेत मतदार जनजागृती अभियान, विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यात भात कापणीला सुरूवात ; परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज
– दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या ; पणत्या, कंदील, फटाके आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग । Diwali News