पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : तरुणाईचा ‘मोस्ट लव्हेबल’ असलेला Valentine’s Day, १४ फेब्रुवारी अर्थातच ‘जागतिक प्रेम दिवस’. बहुसंख्य तरुणाई हौसमौज करत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करते. परंतु, दुसऱ्याबाजूला हीच तरुणाई ‘व्हॅलेन्टाइन डे’कडं सदसद्विवेकबुद्धीनं, डोळसपणे आणि नव्या दृष्टीनं पाहतीये. तरुणाईला आत्मभान आणि समाजभानही आहे. कोणतीही कृती करताना आमचे विचार स्पष्ट आहेत, हेच तरुण मंडळी दाखवून देत आहेत. हेच व्हॅलेन्टाइन डे निमित्त तरुणाईशी साधलेल्या संवादातून दिसून येतंय. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
व्हॅलेंटाईन डे आणि कोणताही विशेष दिन आता तरुणाईला त्याचं महत्त्व समजून घेऊन व ते कृतीत उतरवून साजरा करायचाय. सर्वांच्या विशेषतः पालकांच्या मनाला पटणारा हा तरुणाईच्या विचारांतील आणि दृष्टीकोनातील बदल, ठामपणा खरंच फार छान, स्वागतार्ह व कौतुकास्पद आहे. चला, जाणून घेऊया ‘व्हॅलेंटाईन्स डे’ बद्दलची तरुणाईची प्रातिनिधिक मतं… ( Valentine Day 2024 Special Interview Of Girls And Boys From Varius Sector Information In Marathi )
प्रेमाची नाती साजरी जरुर करुयात – श्वेता जाधव (पदवीधर, नोकरी)
‘व्हेलेन्टाइन्स डे साजरा करणं ही पाश्चात्य संस्कृती आहे असं म्हणतात. पण ही पाश्चात्य संस्कृती असली तरी त्यातलं चांगलं घ्यायला काय हरकत आहे. ‘व्हेलेन्टाइन्स डे’ हा प्रेमभावना व्यक्त करण्यासाठीचा सुंदर दिवस आहे. फक्त प्रेयसी-प्रियकर यांच्यासाठीच हा दिवस नाही. आपण मित्रमैत्रिणी मिळून, पालकांसोबत प्रेम दिवस साजरा करुन त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करु शकतो.’
महत्व-अर्थ जाणून साजरा करावा – मृणालिनी मराठे (वकील)
‘व्हेलेन्टाइन डे किंवा कोणताही विशेष दिन साजरा करताना त्या दिवसाचं महत्व-विशेष समजून घेऊन साजरा केल्यास तो दिवस आपल्याकडून अर्थपूर्ण साजरा होईल व आनंद वाढेल. मोठ्यांनी काही सांगण्या-शिकवण्यापेक्षा तरुण मंडळींनी अधिकचा अभ्यास करुन स्वतःच स्वतःला शिक्षित करायला हवे. व्हेलेन्टाइन्स डे सेलिब्रेशन ही पाश्चात्य संस्कृती असली तरी त्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी तरुणाई स्विकारत आहे, मात्र या प्रेम दिवसाला असलेली प्रेयसी-प्रियकर ही ठराविक चौकट मोडली पाहिजे. कोणत्याही नात्यातलं प्रेम या दिवशी व्यक्त व्हावं. व्हेलेन्टाइन्स डे’ला अनुचित प्रकार घडल्याचंही पाहायला मिळतं. तरुणाई किंवा कोणीही जेव्हा अर्थ समजून घेऊन प्रेम दिवस साजरा केल्यास अनुचित प्रकारही थांबतील.’
आधी जवानांना वंदन करुया- मयूरी रंगारी (विद्यार्थिनी, एमबीए)
‘१४ फेब्रुवारी हा प्रेमदिवस आहे, पण याच दिवशी झालेल्या पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाले होते, त्याची आठवण ही तरुणाईला आणि सर्वांनाच आधी असायला हवी आणि प्राणार्पण केलेल्या जवानांना वंदन करायला हवं. तरुणाई व्हेलेन्टाइन्स डे साजरा करण्यासाठी आतुरलेली असते. पण प्रेयसी आणि पत्नी इतकंच इतर नात्यातील प्रेमही महत्वाचं आहे, तेही या दिवशी व्यक्त करायला हरकत नाही.’
सेलिब्रेशन न करणंच चांगलं – काजल कावरे (एम. ए., नोकरी)
‘व्हेलेन्टाइन्स डे सेलिब्रेशन हा फक्त टाईमपास असतो. टाईमपास करणारेच हा दिवस साजरा करतात. अलीकडे या दिवशी प्रेयसी-प्रियकर एकमेकांना भेटवस्तू देतात, पण भेटवस्तू देऊन प्रेम टिकत नसतं. त्यामुळं हा दिवस नाही साजरा केला तर चांगलं आहे.’
मैत्रीतलं प्रेम साजरं करावं – दिप्ती अगरवाल (विद्यार्थिनी, बी. एससी) :
“व्हेलेन्टाइन्स डे’ला मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन सोबतीने हा दिवस व्यतीत करावा. मैत्रीतल्या प्रेमाचं सेलिब्रेशन यानिमित्तानं होतं.”
प्रेमाच्या आठवणींचा आनंद मिळवावा – हर्षदा जगधने (विद्यार्थिनी)
‘व्हेलेन्टाइन्स डे साजरा करायला हवा. गतवर्षी व्हेलेन्टाइन्स डे’ला मी आणि माझे पती बाहेर फिरायला गेलो होतो, आम्हा दोघांच्या फोटोची सुंदर फ्रेम मला पतीने भेट दिली होती, अशा आठवणी नेहमीच मनाला आनंद देतात. यानिमित्तानं दररोजच्या व्यापातून एक दिवस मनसोक्त गप्पा होतात, आपण मनानं ताजतवानं होतो. म्हणून व्हेलेन्टाइन्स डे साजरा केला पाहिजे.’
अखंड सोबतीचं वचन द्यावं – शितल यशोधरा (संविधान संवादक)
‘प्रेम हे जीवनात विविध रंगांची उधळण करतं. सर्वांनी प्रेम करावं आणि व्हेलेन्टाइन डे देखील साजरा करावा. पण, हा दिवस साजरा करताना कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. या दिवशी परस्परांना भेटवस्तू दिल्या जातात पण त्याबरोबर आणि भेटवस्तूंपेक्षाही आपण आपल्या जोडीदारच्या गरजेला त्या-त्या वेळी सोबत असणं महत्वाचं आहे. ही अखंड सोबत निभावण्याचं वचन या दिवशी दिलं पाहिजे. तसंच विधायक पद्धतीनं प्रेम दिवस साजरा करावा. या दिवसाच्या निमित्तानं वयात येणारया मुलांना प्रेमाचा अर्थ समजून सांगावा. क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेमानं स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली, ही प्रेमाची ताकद असते. हे तेजस्वी उदाहरण तरुणाईनं डोळ्यांसमोर ठेवावं.’
सेलिब्रेशन विचारांवर अवलंबून – होनराज मावळे (संगीत रचनाकार)
‘एखाद्या तरुणाची वा तरुणीची कुटुंबातील वैचारिक जडणघडण कशी आहे यावर ते व्हेलेन्टाइन्स डे साजरा करतील की नाही हे अवलंबून आहे. काहींचे पालक व्हेलेन्टाइन्स डे साजरा करतात त्यामुळं मुलंही आपोआपच तिकडे वळतात. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझ्या पालकांनी हा दिवस कधी साजरा केला नाही, मी शिस्तीत वाढलो त्यामुळं मलाही व्हेलेन्टाइन्स डे साजरा करण्याची गरज वाटत नाही. व्हेलेन्टाइन्स डे’ला जी नकारात्मक झालर लागली आहे ती तरुणाईमुळं लागली आहे. त्यामुळं तरुणाईनी हा दिवस साजरा करताना योग्य पद्धतीनं साजरा करावा आणि व्यक्त केलेलं प्रेम हे सतत जपावं, एका दिवसापुरतं नको.’
थोर दांपत्यांच्या प्रेमाचा आदर्श घ्यावा – जितेन सोनवणे (कवी)
‘हल्ली व्हेलेन्टाइन्स डे साजरा करण्याचं प्रमाण वाढलंय, पूर्वी असं काही नव्हतं. व्हेलेन्टाइन्स डे साजरा करायला काहीच हरकत नाही, प्रेम अनमोल आहे, प्रेमाचा उत्सव झाला पाहिजे. पण, व्हॅलेन्टाइन्स डे’च्या रुपात प्रेमाचा उत्सव साजरा करताना तरुणाईनं स्वतःचं शिक्षण आणि अर्थार्जन या दोन गोष्टींकडं लक्ष गरजेचं नि महत्वाचं आहे. कारणं आर्थिक स्वावलंबनानंच प्रेमात जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करता येणार आहेत. व्हेलेन्टाइन्स डे’ला सर्व मित्र परिवारानं एकत्र येऊन हे विचारमंथन केलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई, माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर दांपत्यांच्या प्रेमाची आठवण काढून त्यांच्यासारखं प्रेम करण्याचा निश्चिय या व्हेलेन्टाइन्स डे’ला करायला हवा.’
सेलिब्रेशन ध्येयपूर्तीसाठी पूरक की मारक – अक्षय वाटवे (लेखक, सह-संस्थापक, लपझप प्रोडक्शन)
‘माणूस उत्सवप्रिय आहे पण कोणताही उत्सव दिखाऊपणे साजरा करु नये. व्हेलेन्टाइन्स डे हा प्रेमाच्या नात्याला-आठवणींना उजाळा देण्यासाठी तसंच नवीन नात्याची सुरवात करण्यासाठी चांगला दिवस असू शकतो. मात्र, व्हेलेन्टाइन्स डे साजरा करण्यासाठी किंवा न करण्यासाठी कोणी कोणावर बळजबरी करु नये. प्रेमभावना ही सर्व नात्यांमध्ये एकसारखीच आहे. प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमात लैंगिक आकर्षण हा वेगळा घटक आहे आणि व्हेलेन्टाइन डे असं लैंगिक आकर्षण सार्वजनिकरित्या व्यक्त करण्याचा दिवस ठरु नये याबाबत प्रबोधन व्हायला हवं. व्हेलेन्टाइन्स डे’सह इतरही विशेष दिन उत्सवासारखं साजरे करणं हे आपल्या जीवनाच्या ध्येयनिश्चितीसाठी आणि ध्येयपूर्तीसाठी पूरक आहे की मारक आहे हे तरुणाईनं तपासून पाहायलाच हवं, मगच त्याचं सेलिब्रेशन करावं. यासाठी समाजातील आदर्श, कर्तृत्ववान, अनुभवी व्यक्तींनी तरुणाईला दिशा द्यावी.’
आपल्या प्रेमासाठी स्वतः काही करावं – प्रतिक शिर्के (मास्टर शेफ)
‘आपण आपल्या आवडीनुसार व्हेलेन्टाइन डे साजरा करावा. कोणाप्रतीही असलेलं प्रेम आपण या एका दिवशी व्यक्त करुयाचं पण ही प्रेमाची-आपुलकीची वागणूक वर्षभरही आपल्या कृतीतून जपली जावी. मी शेफ असल्यानं पत्नीसाठी घरी स्वतः वेगळा काही पदार्थ बनवून ‘व्हेलेन्टाइन डे’ साजरा करायचं ठरवत आहे.’
सेलिब्रेशन मर्यादित हवं – अश्विन पांढरे (विद्यार्थी, बी. कॉम.)
‘व्हेलेन्टाइन्स डे हा दिवस जास्त ज्यांना प्रेयसी व प्रियकर आहे ते तरुण-तरुणी साजरा करतात. प्रेमाची सुंदर आठवण म्हणून हा दिवस साजरा करावा परंतु आपल्या सेलिब्रेशनमुळं इतर कोणाचं मन दुखावणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सेलिब्रेशन मर्यादित असावं.’
अधिक वाचा –
– तळेगाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान । Talegaon Dabhade
– पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी जमा होणार 16वा हप्ता, लाभार्थ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिम । PM Kisan Yojna
– वडगाव शहरातील 300 मुलांना मोरया प्रतिष्ठानने घडवली तोरणा किल्ल्याची सफर । Vadgaon Maval