स्त्री शक्तीला वंदन करणारा नवरात्रोत्सव रविवारपासून (दि. 15 ऑक्टो) सुरु झाला आहे. नवरात्रीत आपण मनोभावे देवीला म्हणजेच स्त्रीशक्तीला नमन करतो. या स्त्रीशक्तीची निरनिराळी रुपं आपल्या अवतीभवतीही असतात. चला मग देवीमातेबरोबरच आपल्यातील या विविध रुपातील स्रीशक्तीलाही वंदन करुया ‘अभिवादन नवदुर्गांना’ सदरातून.
अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् l
अन्नेन क्षणिका तृप्तीर्यावज्जीव चं विद्यया ll
अगदी या सुभाषितच्या अर्थाप्रमाणे, विद्यादानाचे श्रेष्ठत्व जाणून ओम प्रतिष्ठानच्या संचालिका वनिता सावंत “विद्यादान” योजनेद्वारे गरीब विद्यार्थिनीना उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन व आर्थिक मदत उपलब्ध करुन देत आहे. गेल्या दोन वर्षात चाळीस मुलींनी उच्चशिक्षण घेतले असून ही योजना गरीब घरातील शिक्षणाची आस असलेल्या मुलींसाठी वरदानच बनली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- ओम प्रतिष्ठान गेली 12 वर्षे शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर वनिताताईंनी 2012 मध्ये रावेत परिसरातील मुलांसाठी वंडरलॅन्ड प्री-स्कूल ही बालवाडी सुरु केली आणि त्यांचा कार्यविस्तार आता प्राथमिक शाळेपर्यंत पोचला आहे. गतवर्षी ताईंनी मोठ्या मेहनतीने इयत्ता पाचवीपर्यंतची विद्याअंगण शाळा सुरु केली असून पालकांकडूही या शाळेचे कौतुक होत आहे.
वनिताताईंनी 2020 मध्ये गरीब कुटुंबातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारया मुलींसाठी ‘विद्यादान योजना’ सुरु केली आहे. ताई सुट्टीमध्ये आपल्या मूळ गावी गेल्यावर बरेच पालक-मुली त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. तेव्हा अनेक मुलींना पुढं शिकायचं आहे पण पैशाअभावी त्यांच्या शिक्षणात अडथळा येत आहे ही गोष्ट वनिताताईंच्या प्रकर्षाने लक्षात आली. त्यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा गरजू मुलींना मदत करण्याचा निश्चिय केला व त्यातून विद्यादान योजना आकाराला आली. अनेकांशी संवाद साधून जिद्दीने वनिताताईंनी ही योजना भक्कमपणे उभी केली आहे. अनेक लोक या योजनेशी जोडले गेले. ( Navratri Special Abhivadan Navdurgana Article On Vanita Sawant President Of Om Pratishthan Pune )
विद्यादान योजने अंतर्गत आर्थिक मदत देण्यासाठी प्रतिष्ठानकडून ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील शिक्षणाची आस असलेल्या विद्यार्थिनींची निवड केली जाते. त्यासाठी अर्ज भरणे, विद्यार्थिनीची मुलाखत, पालक व शिक्षकांशी बातचीत असे टप्पे आहेत. निवड झालेल्या विद्यार्थिनींसाठीचे शैक्षणिक शुल्क थेट ती शिक्षण घेईल त्या महाविद्यालयाकडे जमा केले जाते, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ही मदत दिली जाते. आतापर्यंत या मदतीतून B. Ed, M. Com, M B A, B B A, Nursing, Engineering, Police training असे विविध अभ्यासक्रम विद्यार्थिनींनी पूर्ण केले असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. याही पुढे जाऊन वनिताताईंकडून प्रेरणा घेऊन विद्यादान योजनेतून मदत मिळालेल्या मुली स्वावलंबी झाल्यावर आपल्या वेतनातून इतर गरजू मुलींसाठीही मदत देत आहेत. आर्थिक मदतीबरोबरच शैक्षणिक मार्गदर्शनही मुलींना दिले जात आहे.
विद्यादानाचा हा यज्ञ अखंड प्रज्वलित ठेवण्यासाठी वनिताताई सातत्याने मेहनत घेत आहेत. म्हणूनच अनेक दानशूर लोक, कंपन्या, सामाजिक संस्था आपला अर्थसहाय्याचा वाटा या योजनेसाठी देत आहेत. विद्यादानाचा वर्षभराचा खर्च साधारण 10 लाखापर्यंतचा आहे. त्यामुळे असंख्य देणारया हातांची या योजनेला आवश्यकता आहे. प्रतिष्ठानशी जोडले गेलेल्या स्वयंसेवकांकडून विद्यादान योजनेची माहिती विविध जिल्ह्यांमध्ये पोचवली जात आहे. आगामी काळात गरजू विद्यार्थिनींपर्यंत विद्यादान योजनेचा लाभ पोचवून त्यांना स्वावलंबी करण्याचे वनिताताईंचे ध्येय आहे. अनेक सावित्रीच्या लेकीना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी वनिताताई स्वतः लक्ष्मी अन् सरस्वती बनल्या आहेत.
“लातूरच्या एका मुलीचे लवकर लग्न झाले. तिला एक मुलगी आहे. तिचा पती मजुरी करतो. घरात अतिशय हालाखीची परिस्थिती आहे. तिला विद्यादान योजनेतून मदत मिळाली व ती आता नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे व तिच्यातला बदल खरोखरच पाहण्यासारखा आहे.” अशी माहिती वनिताताई यांनी दिली.
“विद्यादान योजनेमुळे मुलींना आयुष्यात मोठा बदल होत आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षण खोळंबून न राहता बऱ्याच मुली उच्च शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. सामान्य नागरिकांनीही विद्यादान योजनेसाठी आपला खारीचा वाटा द्यावा. आपण सारे मिळून गरीब घरातील मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी होण्यासाठी साथ देऊया.” वनिता सावंत (अध्यक्षा, ओम प्रतिष्ठान)
- लेखन आणि माहिती संकलन – संध्या नांगरे
अधिक वाचा –
– स्थानिकांची हुशारी आणि प्राणीमित्रांच्या प्रयत्नांमुळे घोरपडीला जीवनदान । Vadgaon Maval
– पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने येळसे गावात तयार झालेली अत्याधुनिक रोपवाटिका आदर्शवत – माजी मंत्री बाळा भेगडे
– मावळमधील मुलींसाठीचे एकमेव महाविद्यालय सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाला ‘नॅक’कडून ‘बी’ ग्रेड मानाकंन