Dainik Maval News : वडगाव मावळ येथील न्यायालयाची बनावट दाखल्याद्वारे दिशाभूल केल्याबद्दल बोगस जामिनदारावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक अधिक्षिका यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणात खोटा बनावट दाखल बवनून देण्यात मदत करणाऱ्या सर्वच व्यक्तींवर कारवाई होणार असल्याचे वडगाव पोलिसांनी सांगितले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव मावळ (ता.मावळ, जि.पुणे) यांच्या न्यायालयात तळेगाव पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील तुरुंगात असलेल्या आरोपी करणसिंग रजंपूतसिंग दुधाने याचा जामिनदार म्हणुन धनंजयसिंग विजयसिंग परदेशी (रा. थेऊरफाटा, कुंजीरवाडी, ता.हवेली. जि.पुणे) याने दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी न्यायालयासमक्ष हजर होऊन नमुद आरोपीचा ऐपतदाराचा दाखला सादर केला होता. ( case registered against bogus surety who misled Vadgaon Maval court by creating fake document )
तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सदरचा दाखला तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांच्या मार्फत पडताळणीकामी निवासी नायब तहसिलदार हवेली (जि. पुणे) यांच्याकडे पाठविला होता. त्यावेळी तहसीलदार यांनी तो ऐपतदाराचा दाखला दिलेला नाही, असे पत्रासह कळविले. आरोपीत धनंजयसिंग विजयसिंग परदेशी याने तो दाखला निवासी नायब तहसिलदार यांचा खोटा शिक्का तयार करून, खोटा मजकूर नमूद करून बनविला, तो खोटा आहे हे माहीत असतांना तो खरा दर्शवून न्यायालयात वापरला, असे समोर आले.
सदरचा दाखला हा मौल्यवान दस्तऐवज खोटा सादर केला आणि त्याचा वापर केला आणि त्याद्वारे न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सहायक अधिक्षिका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीत धनंजयसिंग विजयसिंग परदेशी याचे विरुध्द त्याने केलेल्या वरील कृत्याकरीता वडगाव मावळ पोलिस ठाणे येथे भा.द.वि.स. कलम 420, 501, 467, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आशिष काळे हे करीत आहेत.
सदरच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा करण्यास मदत करणाऱ्या इतर सहभागी आरोपींवर देखील कारवाई होणार आहे. वडगाव मावळ परिसरात अशा बनावट कागदत्रे बनवून सरकारी कार्यालयाची फसवणूक व अशा बनवेगिरी करण्याऱ्या एजंटावर यापुढेही कारवाई होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने जाहीर केलेले आहे.
अधिक वाचा –
– बालेवाडी येथे महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ । Pune News
– मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड । Pune News
– पवनानगर परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये, गड-किल्ले येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा