Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सत्तेवर आली आहे. मात्र यात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सर्वाधिक 132 जागा निवडून आल्या असून भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने हा महाविजय साकारला आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने साकारलेल्या या विजयाबद्दल माजी राज्यमंत्री तथा मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांसह भाजपाचे अन्य नेते उपस्थित होते.
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि महायुतीत मावळची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. तसेच विद्यमान आमदार सुनिल शेळके यांना पुन्हा तिकीट मिळाले. यामुळे नाराज झालेल्या बाळा भेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंडाची भूमिका घेत पक्षाच्या पदांचे राजीनामे देत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठींबा दिला होता.
यासह शेळके विरोधकांंची फळी उभारुन मावळ पॅटर्न राबवला होता. परंतु निकालाअंती पुन्हा सुनील शेळके हेच मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने भेगडे यांची पिछेहाट झाली. मात्र राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले असल्यामुळे बाळा भेगडे यांनी सर्वप्रथम मुंबईत जात देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
बाळा भेगडे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यानंतर तालुक्यातील राजकारणात आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबत बाळा भेगडे यांच्या भुमिकेची चर्चा होत आहे. परंतु विधानसभा निवडणूक काळातही भेगडे यांनी पक्षाचे सदस्यत्व सोडले नसल्याने कार्यकर्ता म्हणून ते अद्यापही पक्षात असल्याने फडणवीस यांच्याकडे अभिनंदनासाठी ते गेले असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल
– अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result
– ‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा
