Dainik Maval News : स्वराज्य व धर्मरक्षणासाठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी धर्मवेडा क्रूरकर्मा औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार सहन करीत सर्वोच्च बलिदान दिले. छत्रपती शंभूराजेंनी ४० दिवस अत्याचार सहन केले आणि बलिदान दिले. संभाजीराजेंचे हे बलिदान सदैव स्मरणात रहावे याकरिता शंभूभक्त दरवर्षी बलिदान मास पाळतात. मावळ तालुक्यात देखील धर्मवीर बलिदान मास पाळणारे शेकडो शंभूभक्त आहेत.
मावळ तालुक्यातील या शंभूभक्तांना बलिदान मास निमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक व श्री क्षेत्र तुळापूर समाधी दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. श्री प्रशांतदादा भागवत युवा मंच च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शंभू भक्तांसाठी रविवारी, दि. १ मार्च २०२६ रोजी श्री क्षेत्र वढू बुद्रुक व श्री क्षेत्र तुळापूर समाधी दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये रविवारी सकाळी ७ वाजता यात्रेस प्रारंभ होईल. तदनंतर, सकाळी १० वाजता श्री क्षेत्र तुळापूर येथे दर्शन, सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन होईल. त्यानंतर दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान मयुरी लॉन्स (चौफुला) येथे शिवशंभू चरित्र व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध शिवव्याख्याते आशुतोष झा यांचे व्याख्यान हे शंभूभक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे. याप्रसंगी प्रशांतदादा भागवत, मेघाताई भागवत, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे आदी मान्यवर आणि श्री प्रशांतदादा भागवत युवा मंचचे सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
धर्मवीर बलिदान मास म्हणजे?
बलिदान मास म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ पाळला जाणारा सुमारे महिनाभराचा (फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या) स्मृती काळ होय. हा काळ औरंगजेबाच्या अत्याचारांना तोंड देत शंभूराजांनी सहन केलेल्या यातनांची आठवण म्हणून, काही सुखांचा त्याग करून श्रद्धांजली वाहण्यासाठी पाळला जातो. यंदा फाल्गुन अमावस्या ही गुरुवार, दिनांक १९ मार्च रोजी आहे. या दिवशी तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या दिवसापर्यंत धर्मवीर बलिदान मास पाळला जात आहे.