Dainik Maval News : मावळ तालुक्यातील करंजगाव येथे ‘विधी जागर’ हे एक दिवसीय कायदेविषयक जनजागृती शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित कै. अॅड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय, विष्णुपुरी तळेगाव दाभाडे (ता. मावळ) यांच्या पुढाकाराने व तालुका विधी सेवा समिती, वडगाव मावळ बार असोसिएशन, पुणे बार असोसिएशन व ग्रुप ग्रामपंचायत करंजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.२१ फेब्रुवारी) भैरवनाथ मंदिर, करंजगाव येथे हे शिबिर पार पडले.
ग्रामीण नागरिकांना शेतीजमीन, कुळकायदा, ज्येष्ठ नागरिक हक्क व ग्राहक संरक्षण कायद्यांविषयी सुलभ व तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य कैलास पौळ यांच्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली. विधी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून न्याय सुलभ करण्यासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत ग्रामीण भागात कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याचा संस्थेचा संकल्प व्यक्त केला.
अॅड. प्रतापराव शेलार यांनी महिला व बालक संरक्षण कायदे, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक तरतुदी यांची माहिती दिली. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी ३२एम, ३२जी प्रमाणपत्रे, सातबारा उतारा, वारस नोंद व महसूल प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र हुद्दार यांनी ज्येष्ठ नागरिक व ग्राहक संरक्षण कायद्यांवरील उपाययोजना स्पष्ट केल्या. अध्यक्षीय भाषणात डी. के. अनभुले यांनी संविधानिक मूल्ये व नागरिकांचे हक्क-कर्तव्ये यावर भाष्य केले.
महेशभाई शाह संस्था सल्लागार यांच्या उपस्थिती व प्रोत्साहन मुळे व समन्वयक पाठक, कांबळे व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुयोग्य नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडला.
शेखर साबळे यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सरपंच उज्वला पोटफोडे यांनी आभार मानले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्तांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन करून भविष्यातही असे समाजाभिमुख कार्यक्रम व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम ग्रामस्थांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
