Dainik Maval News : मावळ तालुक्यातील हजारो नागरिकांसाठी जीवनदायिनी असलेल्या पुणे – लोणावळा लोकल सेवेबाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पुणे ते लोणावळा दरम्यानचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. याकरिता रेल्वे विभागाने विशेष प्रयत्न केले आहेत.
पुणे – लोणावळा मार्गावर सध्या ताशी ११० किलोमीटर वेगाने ट्रेन धावते. मात्र हीच ट्रेन आता १३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावेल. हे काम अचानक होणार नाहीये, परंतु टप्प्या टप्प्याने रेल्वेचा वेग वाढविण्यात येईल. तर, जून २०२६ पर्यंत पुणे ते लोणावळा रेल्वे १३० किलोमीटर प्रति तास वेगाने चालविण्याचे रेल्वे विभागाचा मानस आहे. ह्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून पुणे – लोणावळा रेल्वे ट्रॅकवर अनेक तांत्रिक सुधारणा सुरु आहेत.
पुणे-लोणावळा मार्गावरील प्रवाशांची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये अनेकांना नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पुणे- लोणावळा ट्रेनने प्रवास करावा लागतो, तर दुसरीकडे पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त असते. अशावेळी प्रवाशांना कमी वेळेत प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे विभागाने हे पाऊल उचलले आहे.
त्यानुसार पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रेल्वेचा वेग वाढविले तर प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वारंवार होणाऱ्या विलंबाच्या तक्रारी सुद्धा बंद होतील, असा कयास आहे.
रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी ओव्हरहेड पॉवर केबल्स आणि संपर्क तारा बदलल्या जात आहेत. रेल्वे खांबांवर आता स्वयंचलित टेंशनिंग उपकरणे बसवली जात आहेत. यामुळे हवामान, उष्णता किंवा पाऊस काहीही असो, तारांवर सतत ताण राहील आणि तांत्रिक समस्या कमी होतील.
पुणे-लोणावळा विभागातील एकूण १५२ ट्रॅक किलोमीटरपैकी १३२ किलोमीटर पूर्ण झाले आहेत. उर्वरित विभागाचे काम सुरू असून ये जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रेल्वेचा वेग वाढवल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ अंदाजे ४ ते ५ मिनिटांनी कमी होईल.
रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी, बहुतेक काम रविवारी मेगाब्लॉक दरम्यान केले जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जात नाही. सर्व तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतरच गाड्यांचा वेग वाढवला जाईल असेही रेल्वे विभागाने स्पष्ट केलं.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण


