दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी होत आहे. सभापती व उपसभापती पदासाठी संचालक मंडळातील एकूण १३ जण इच्छुक आहेत. तर समितीच्या अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाचा केवळ दोन वर्ष कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे कमी कालावधीत सर्व इच्छुकांना संधी देण्यासाठी सदस्यांनी एकमत करत लॉटरी पद्धतीने सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यामध्ये सभापती पदासाठी तीन तर उपसभापती पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.
शिल्लक राहिलेला २४ महिन्यांचा काळ सर्वांनी वाटून घेऊन निवडणूका बिनविरोध कराव्यात त्यासाठी चिठ्ठी पद्धतीचा वापर करून दोन्ही पदे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घ्यावी असा निर्णय सर्वच इच्छुकांनी घेतला आहे. त्यामुळे बुधवारी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकाला फार अल्पकाळ मिळणार आहे. त्यामुळे याकाळात धोरण निश्चिती आणि विकासकामे किती होतील, याबद्दल शंकाच आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती संभाजी शिंदे आणि उपसभापती नामदेव शेलार यांनी पदाचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवडणूक वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात होणार आहे. यासाठी सभापतीपदासाठी ९ जण तर उपसभापती पदासाठी ४ जण इच्छुक आहेत. ज्यावेळी बाजार समितीची निवडणूक झाली होती, त्यावेळी सर्व सभासदांना पदाची संधी मिळेल या हेतूने कालावधी निश्चिक करण्यात आला होता, परंतु तदनंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राजीनामे लांबले आणि अखेर यात तीन वर्षे निघून गेली.
सध्या सभापती – उपसभापती यांचे राजीनामे झाले असले तरी कालावधी अल्प राहिला आहे. सभापती पदासाठी ९ जण इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी २४ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे त्या पदासाठी अडीच ते तीन महिन्यांचा अल्पकाळ मिळणार आहे. तर उपसभापती पदासाठी २४ महिन्यात ४ इच्छुक असलेल्यांना ६ महिने इतका कालावधी मिळू शकेल. अल्पकाळ मिळत असला तरी पद सोडायचे नाही या भूमिकेतून इच्छुकांमधील एकमत झाल्याचे दिसते.
आधी कोण आणि नंतर कोण यावर विचार विनिमय करण्यापेक्षा सभापती व उपसभापती पदासाठीच्या इच्छुकांच्या नावांच्या चिट्ट्या करून लॉटरी पद्धतीने त्या पदांसाठी चिठ्ठ्या काढायच्या ज्यांची चिठ्ठी प्रथम येईल ते सभापती व उपसभापती होतील. यावर १३ जणांनी एकमत केल्याने निवडणुकीमधील होणारा संघर्ष टळला आहे. यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता लोकशाही पद्धतीने लॉटरी काढायची असे नुकत्याच झालेल्या गोपनीय बैठकीत ठरल्याचे समजते. या बैठकीत मावळ तालुक्यातील दोन मातब्बर नेते उपस्थित होते आणि त्यांच्याच उपस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप न होऊ देता लॉटरी पद्धतीने निवडणूक पार पाडण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.
- मे २०२३ मध्ये मावळ बाजार समितीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील १७ तर भाजपच्या पॅनेलमधील १ असे एकूण १८ संचालक निवडून आले होते. त्यानंतर २४ मे २०२३ रोजी सभापतीपदी संभाजी शिंदे आणि उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची निवड झाली होती.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना


