Dainik Maval News : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करून सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका तसेच ग्रामपंचायत मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याचा मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभ मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पार पडणार आहे. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात समारंभांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार असून राष्ट्रध्वजाला मानवंदना, राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन करण्यात येणार आहे. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि संविधानिक मूल्ये यांवर आधारित संदेश नागरिकांना देण्यात येणार आहेत. यादिवशी सकाळी 8.35 ते 9.35 यावेळेमध्ये इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार नाही. ज्यांना स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल त्यांनी तो सकाळी 8.35 पूर्वी अथवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण, वाद-विवाद स्पर्धा, निबंध, कविता, देशभक्तीपर गीत आणि भाषण स्पर्धा, तसेच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारती तसेच ऐतिहासिक किल्ल्यांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असून ध्वजारोहण व ध्वजसंहितेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, शौर्य पुरस्कार विजेते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार असून सर्व संबंधित यंत्रणांनी स्वातंत्र्यदिन समारंभ यशस्वी आणि शिस्तबद्धरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे येथे राज्यपाल तर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्तेध्वजारोहण
भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. राज्याचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तर पुणे येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई शिंदे (ठाणे), उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (बीड), चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे (नागपूर), राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील (अहिल्यानगर), हसन समिना मियालाल मुश्रीफ (नंदुरबार), चंद्रकांतदादा सरस्वती बच्चू पाटील (सांगली), गिरीष गिता दत्तात्रय महाजन (नाशिक), गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक (पालघर), गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील (जळगाव), दादाजी रेश्माबाई दगडू भुसे (अमरावती), संजय प्रमीला दुलीचंद राठोड (यवतमाळ), उदय स्वरुपा रविंद्र सामंत (रत्नागिरी), जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल (धुळे), पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे (जालना), अतुल लिलावती मोरेश्वर सावे (नांदेड), डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके (चंद्रपूर), शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई (सातारा), अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार (मुंबई उपनगर), दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे (वाशिम), शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले (लातूर), जयकुमार कमल भगवानराव गोरे (सोलापूर), नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ (हिंगोली), संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट (छत्रपती संभाजीनगर), प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक (धाराशिव), भरत शिवाजी विठाबाई मारुती गोगावले (रायगड), मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) (बुलढाणा), नितेश निलम नारायण राणे (सिंधुदुर्ग), आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर (अकोला), प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर (कोल्हापूर), आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (गडचिरोली), माधुरी मिरा सतिश मिसाळ (भंडारा) डॉ. पंकज कांचन राजेश भोयर (वर्धा), मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर (परभणी) तसेच इंद्रनील अनिता मनोहर नाईक (गोंदिया) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
कोकण विभागीय आयुक्त कार्यालय येथे आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पालकमंत्री अथवा मंत्री अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत तर विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
– शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद



