वडगाव मावळ, दि. ९ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी कथितरित्या आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सांगत मावळ भाजपाने गुरुवारी (दि.८) वडगाव येथे आमदार सुनील शेळकेंविरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी, सुनील शेळके यांना कायम विरोध राहणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे २०१९ पासून भाजपाविरुद्ध आमदार सुनील शेळके असा सुरू झालेला संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे.
२०१९ विधानसभेनंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही सुनील शेळके यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येत निर्माण केलेल्या खास मावळ पॅटर्नला (यात स्थानिक भाजपाचे काही नेते, कार्यकर्ते सहभागी) आमदार शेळके यांच्या झंझावातामुळे अपयश आले. तदनंतर, डिसेंबर २०२५ मध्ये मात्र तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्व मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. यामुळे दोन्ही पक्षामधील संघर्ष कमी झाल्याचे वाटत होते. परंतु निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात युती फिस्कटली, तदनंतर जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत हा पुन्हा सुरु झाला.
दरम्यान, मागील महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांनी भाजपा कार्यकर्त्यांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा दावा करुन भाजपने गुरुवारी निषेध मोर्चा काढला. हा निषेध मोर्चा देखील सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. परंतु आमदार शेळके यांचे जुनेच विरोधक पुन्हा यानिमित्त एकत्र आले आणि आमदार शेळके यांच्या विरोधात भूमिका मांडून गेल्याने २०१९ पासून भाजपाविरुद्ध आमदार सुनील शेळके असा सुरू झालेल्या संघर्ष अजुनही कायम असून त्याची धार अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले.
सुनील शेळके आणि भाजपा यांच्यातील संघर्षाचा इतिहास
१९९५ पासून सलग २५ वर्षे मावळात भाजपाची सत्ता राहिली. रुपलेखाताई ढोरे ते बाळा भेगडे असे सलग भाजपाचेच उमेदवार मतदारसंघात विजयी झाल्याने, हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु जसा भाजपाने काँग्रेसमधील बंडखोरीचा फायदा घेतला, तसाच तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये भाजपमधील बंडखोरीचा फायदा घेतला. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा ९० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तेव्हापासून भाजप आणि आमदार सुनील शेळके यांच्यातील राजकीय वैमनस्य, संघर्ष वाढत गेला. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतरही मावळात युती झाली नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक


