वडगाव मावळ, दि. ९ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भात आणि सोयाबीन पिकांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी मावळ पंचायत समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांच्या नेतृत्वात पं. स. सदस्यांनी गुरुवारी (दि. ८) तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
याप्रसंगी सभापती सुनिता येवले यांच्यासह पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलक, रेश्मा देवकर, प्राची गायकवाड, शैलाताई कालेकर, आशा मोरमारे आणि माजी सरपंच मनोज येवले आदी उपस्थित होते.
निवेदनात काय?
चालू हंगामात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली प्रतिकूल हवामान परिस्थिती, तसेच पावसातील अनियमिततेमुळे मावळ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रामुख्याने भात आणि सोयाबीन या पिकांवर अवलंबून आहे. मात्र, प्रतिकूल हवामानाचा परिणाम या दोन्ही पिकांच्या उत्पादनावर झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भात आणि सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करावी. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करावेत, पंचनाम्यांची आवश्यक नोंद घेऊन त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ही कार्यवाही वेळेत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात यावी. असेही निवेदनात नमूद आहे.
मावळ तालुक्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांचा बांधावर जावून नुकसानीची पाहणी करावी, तसेच तालुक्यातील परिस्थितीचा विचार करून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्याकडे आज केली. – सुनीता मनोज येवले, सभापती, पंचायत समिती मावळ
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

