भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी पावसाळी अधिवेशनात पवना जलवाहिनी प्रकल्पाचा मुद्दा उचलून धरत ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आणि पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाकरिता आग्रह धरला. त्यांच्या या मागणीला लगेचच मावळ तालुक्यातून विरोध होऊ लागला असून पहिला विरोध हा महेश लांडगे यांच्या पक्षातून अर्थात भाजपाकडून झाला. त्या पाठोपाठ आता अन्य पक्ष, संघटना यांनीही प्रकल्प सुरु करणे तर दुसरच, हा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी केली आहे. शिवसेना पक्षाची युवा शाखा असलेल्या युवासेनेमार्फत याबाबत तहसीलदार मावळ विक्रम देशमुख यांना पत्र देण्यात आले आहे. ज्यात, आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का? असा खरमरीत सवाल केला आहे. ( cancel pavana aqueduct project permanently demand by maval shiv sena yuvasena branch )
काय म्हटलंय पत्रात?
“दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले. अनेक आंदोलक शेतकरी जखमी झाले. तेव्हापासून आजतागायत हा प्रकल्प रद्द करा म्हणून मावळ शिवसेनेची आग्रही भूमिका होती. जोपर्यंत बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायम स्वरूपी रद्द होत नाही तोपर्यंत ही भुमिका कायम राहील. आमचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध नाही, परंतू बंदिस्त जलवाहिनीतून पाणी देण्यास विरोध कायम आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील जलवाहिनी प्रकल्प करण्यासंदर्भातील भूमिका घेऊ नये, अन्यथा यापुढील आंदोलन हे पिपरी चिंचवड महानगरपालिकेत केले जाईल. आमचे तीन शेतकरी या बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प विरोधी आंदोलनात शहीद झालेत. आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का? तरी आम्ही आपणास निवेदन करत आहोत की, स्थानिक शेतकऱ्यांची या प्रकल्पासंदर्भात जी भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे. म्हणून याबाबत आपण लक्ष घालून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा, ही नम्र विनंती.”
असे पत्र तहसीलदार विक्रम देशमुख यांना युवासेना मावळ तालुका यांच्या वतीने देण्यात आले आहे. हे पत्र देताना युवनासेनेचे मावळ तालुका अध्यक्ष विशाल हुलावळेसह अन्य सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ( cancel pavana aqueduct project permanently demand by maval shiv sena yuvasena branch )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भूमिपुत्रांसाठी राष्ट्रवादीचा एल्गार! ‘मावळमध्येच स्थानिक तरूणांना रोजगार मिळावा’, तहसीलदार आणि आमदारांना निवेदन
– पुण्यात तलवारीने दहशत निर्माण करून पसार झालेल्या आरोपीला तुंग किल्ला परिसरातून अटक
– औरंगाबादमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कामशेत पोलिसांकडून चिखलसे गावाजवळ सुटका; अट्टल आरोपी अटकेत