मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले आहे. बाबर यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अनिल बाबर यांची प्रकृती काल (दि. 30) दुपारपासून बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सांगलीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच अनिल बाबर यांची प्राणज्योत मावळली. ह्या घटनेने बाबर कुटुंबीय, आमदार बाबर यांच्या मतदारसंघावर आणि एकनाथ शिंदे गटावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आमदार बाबर यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ( CM Eknath Shinde Faithful Shiv Sena MLA Anil Babar Passed Away Sangli )
पाणीदार आमदार –
आमदार अनिल बाबर हे सांगलीच्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर हे अत्यंत विश्वासू आमदार होते. बाबर यांची ओळख पाणीदार आमदार अशी होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. शिंदेंच्या बंडात त्यांनी चांगलीच साथ दिली होती. तसेच त्यापूर्वी अनेकदा महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सरपंच ते 4 वेळा आमदार –
ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावे दिली गेली, त्यात अनिल बाबर यांचे नाव आघाडीवर होते. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर चार वेळा आमदार झाले होते. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलेले. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते अगोदर निवडून आले होते.
टेंभू योजनेसाठी जीवाचा आटापीटा –
टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो. टेंभू योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी खानापूर, तासगाव, खटाव, सांगोला यासह अन्य तालुक्यातील टेंभूपासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे यासाठी टप्पा क्रमांक सहाचा मंजुरी प्रस्ताव सभागृहात मांडून त्यास मान्यता घेतली.
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाचे वृत्त समजतात नातेवाईक व अनेक कार्यकर्त्यांनी सांगलीकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाने खानापूर मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस अहोरात्र लढणारा नेता गेल्याने खानापूर मतदारसंघात शोककळा पसरली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सर्व बैठका रद्द करत बाबर यांच्या अंत्यविधीसाठी सांगलीला रवाना झाले आहेत.
अधिक वाचा –
– ‘मामांना महाराष्ट्र भूषण’, मराठी सिनेरसिक आनंदी! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण जाहीर । Ashok Saraf Maharashtra Bhushan
– मावळकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या लोकल ट्रेनचे रावसाहेब दानवेंच्या हस्ते होणार उद्घाटन । Pune Lonavala Local Train
– मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या ‘त्या’ 4 आंदोलकांचा कार्ला येथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार । Maratha Reservation