Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रलंबित असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर तसेच देहू-येलवाडी रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांनी बुधवारी (दि.२४) महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रभावीपणे मांडला. या विषयावर बोलताना आमदार शेळके यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता, चुकीचे नियोजन आणि ठेकेदारांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे काम अद्याप अपूर्ण असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रोज हजारो वाहनचालक, कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी देहूनगरीत दाखल होणार आहेत. असे असताना देहू-येलवाडी या रस्त्याच्या कामासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. डिसेंबर २०२५ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतरही ठेकेदाराने काम सुरू केले नसल्याबद्दल आमदार शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आषाढी वारी तोंडावर आलेली असताना प्रशासनाने साधी डागडुजी किंवा खड्डे बुजविण्याचे कामही केले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून वारकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. लाखो भाविकांची श्रद्धा आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता दोन्ही रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू करावीत, अशी आग्रही मागणी आमदार सुनील शेळके यांनी सरकारकडे केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू



