Dainik Maval News : मध्य रेल्वे प्रशासनाने दापोडी, देहूरोड आणि मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे-लोणावळा मार्गावर रेल्वेचे संचलन सुरळीत आणि गतिमान होणार आहे. तसेच मेल, एक्स्प्रेस आणि वंदे भारत ट्रेनचा प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे.

पुणे-लोणावळा हा रेल्वे मार्ग अतिशय व्यस्त असून या मार्गावर दररोज सुमारे १५८ गाड्या धावतात, ज्यातून सरासरी दोन लाखांहून अधिक जण प्रवास करतात. मध्य रेल्वेचा पुणे विभाग हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा विभाग असून मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईला येणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस या पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरून धावतात.
याच मार्गावरुन पुणे-लोणावळा लोकल आणि मालगाड्याही धावतात. हा मार्ग व्यस्त असल्यामुळे रेल्वे गाड्यांचे नियोजन करताना प्रशासनाची दमछाक होते. तसेच एक्स्प्रेस गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडते. रेल्वेचे संचलन वेळेत होण्यासाठी तीन स्थानकांवर ७५० मीटरची लूप लाइन टाकण्यात येणार आहे. दापोडी, देहूरोड आणि मळवली स्थानकांवर जमिनीचे सपाटीकरण सुरू आहे.
‘लूप लाइन’चा उपयोग
जेव्हा एकाच मार्गावर एखादी मालगाडी हळू जात असते आणि मागून एखादी एक्स्प्रेस गाडी येत असते, तेव्हा त्या मालगाडीला ‘लूप लाइन’वर थांबवले जाते. त्यामुळे वेगवान गाडी मुख्य मार्गिकेवरून सुरक्षितपणे पुढे जाऊ शकेल. किंवा एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन गाड्यांना क्रॉसिंग देण्यासाठी एका गाडीला ‘लूप लाइन’वर थांबवले जाते.
‘लूप लाइन’ म्हणजे काय?
‘लूप लाइन’ म्हणजे रेल्वे स्कानकाजवळ मुख्य मार्गाला समांतर असा अतिरिक्त रेल्वे ट्रॅक असतो. ही मार्गिका मुख्य मार्गिकेपासून सुरू होते, स्टेशनच्या हद्दीतून जाऊन पुन्हा पुढे मुख्य मार्गिकेलाच जोडली जाते.

तीन स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्यात येणार आहे. त्यासाठी जमीन सपाटीकरण सुरू आहे. काम पूर्ण होताच पुणे-लोणावळा प्रवास वेगाने होईल. – हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू



