Dainik Maval News : खून, खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आठ आरोपींना वडगाव मावळ येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सुनील शंकर शिंदे (वय ४२ वर्ष), सतीश शंकरराव शिंदे (वय ३८ वर्ष), बबन दगडू शिंदे (वय ५३ वर्षे), बाळु मारुती गोसावी (वय ४८ वर्ष), ऋषिकेश सुरेश शिंदे (वय ३३ वर्ष), दगडू उर्फ सुभाष अशोक खांडभोर (वय ३२ वर्ष), शंकर अनंतराव शिंदे (वय ७२ वर्ष), पंकज बाळु खांडभोर (वय ३५ वर्ष) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर, आरोपी सुरेश रामभाऊ देशमुख हा फरार आहे.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये आठही दोषी आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, तसेच कलम ३०७ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याशिवाय आरोपी शंकर शिंदे याला कलम ३५४ अन्वये ५ वर्षांची शिक्षा व १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. तसेच, इतर विविध कलमांनुसार दोन वर्षे साधा कारावास, कलम ३४१ अंतर्गत एक महिना सक्तमजुरी, कलम ५०६ अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी, कलम १४३ अंतर्गत सहा महिने साधा कारावास, कलम १४७ अंतर्गत दोन वर्षे साधा कारावास आणि कलम १४८ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चामे यांनी केला. प्रभारी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गादेकर, पोलिस कर्मचारी के. व्ही. नांगरे, हवालदार प्रतीक केदारे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी तावरे यांनी खटल्याच्या कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सहा वर्षांपूर्वी जांभूळ येथे घडला होता गुन्हा
दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी जांभूळ येथे एक्झर्बिया सोसायटीजवळ फिर्यादी ही तिची मुले शुभम व प्रशांत यांच्यासह ईरटीका गाडीने जात असताना पाठीमागून स्विफ्ट व इको गाडीतून आलेल्या आरोपींनी तुला गाडी नीट चालवता येत नाही का, असे विचारून दोघांना शिवीगाळ व लोखंडी कोयता, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याबाबत संबंधित आरोपी विरुद्ध वडगाव मावळ पोलिस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’


